‘अल निनो’मुळे हिवाळ्यात हवा प्रदूषण १० टक्क्यांनी वाढणार 
कोल्हापूर

Air Pollution| ‘अल निनो’मुळे हिवाळ्यात हवा प्रदूषण १० टक्क्यांनी वाढणार

पावसाची माघार आणि पश्चिम आशियातून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यभर धुक्याची चादर

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : ऐन हिवाळ्याच्या तोंडावर महाराष्ट्रातील हवेचा घसरत चाललेला दर्जा, दुष्काळाचे सावट आणि त्यात भर घालणारा ‘अल निनो’चा विळखा, अशा तिहेरी कात्रीत अडकलेल्या राज्यावर आता हवा प्रदूषण तीव्र होण्याचे संकट घोंगावत आहे.

पॅसिफिक महासागरात सक्रिय असलेल्या तीव्र ‘अल निनो’मुळे यंदाच्या हिवाळ्यात राज्यामध्ये हवेच्या प्रदूषणात सुमारे १० टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाऊस लवकर परतल्यामुळे आणि मान्सूनोत्तर पावसाच्या कमतरतेमुळे वातावरणातील धूळ व प्रदूषक कण वाहून जाण्याची नैसर्गिक प्रक्रिया ठप्प झाल्याने हवेतील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागले आहे. येणाऱ्या दिवसांत प्रदूषणाची स्थिती आणखी गंभीर बनण्याची भीती आहे.

ऑक्टोबरला सुरुवात होताच राज्याला कोरड्या हवेसोबतच विचित्र, कोंदट धुरक्याने (हेझ) वेढायला सुरुवात केली आहे. एरव्‍ही परतीच्या पावसाच्या सरींनी या काळात अल्हाददायक वातावरण असायचे. मात्र, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनुसार वाऱ्यांच्या बदलणार्‍या प्रवाहामुळे राजस्थान, पाकिस्तान आणि थेट पश्चिम आशियातून धूळमिश्रित व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत.

अशा स्वरूपाच्या हवामान रचनेत वारे खाली बसतात. त्यामुळे वाहने आणि उद्योगांमधून उत्सर्जित होणारे विषारी वायू वातावरणात वर जाऊ शकत नाहीत. परिणामी, मुंबईसह लगतच्या किनारपट्टी आणि अंतर्गत शहरांमध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच धुक्याची (हेझ) जाड चादर पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारचे धुके कोल्हापूर शहरात रात्रीपासूनच जाणवू लागले आहे.

  • ‘अल निनो’मुळे कोरडे हवामान दीर्घकाळ टिकून राहते. पावसात खंड पडल्याने माती कोरडी पडून हवेत उडते, ज्यामुळे हवेतील सूक्ष्म धूलिकण थेट वाढतात. एरव्‍ही या सरी वातावरणातील विषारी वायू आणि धूर धुवून काढत असत. हा नैसर्गिक पाऊस न झाल्याने तसेच हवेतील प्रतिचक्रीवादळामुळे प्रदूषक जमिनीलगत अडकून राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT