कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) एमआयडीसीमध्ये सापडलेल्या तस्कर सापाच्या आठ अंड्यांतून पिल्लांचा जन्म झाला आहे. वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात ३८ दिवस अंड्यांची काळजी घेण्यात आली होती.
गोकुळ शिरगाव एमआयडीसीत आढळलेली तस्कर सापाची अंडी वन्यजीव बचाव पथकाचे (आरआरटी) वैभव आवळे यांनी सुखरूप ताब्यात घेतली. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, रेंज ऑफिसर नंदकुमार नलवडे, वनरक्षक ओंकार भोसले, पशुवैधकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापाची अंडी उबवण्यासाठी वन्यजीव उपचार केंद्र व वन्यजीव बचाव पथकाच्या ओंकार काटकर, राकेश शिकरे, यश खबाले, अमोल पाडळे यांना देण्यात आली.
सहायक पशु पर्यवेक्षक अमित कुंभार, वन्यजीव बचाव पथकाचे आशुतोष सूर्यवंशी यांनी अंडी उबवण्यासाठी लागणारी प्रक्रिया योग्यप्रमाणे तयार केली. एका बकेटमध्ये कोको पिटात आठ अंडी सुरक्षित ठेवण्यात आली होती.
तस्कर सापाविषयी...
तस्कर साप बिनविषारी आणि शांत स्वभावाचा असतो.
लांबी साधारण एक मीटरपर्यंत, जाडी २ ते ३ से.मी. असते.
रंग तपकिरी, बदामी, पिवळसर असतो.