कोल्हापूर : कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलची आंतरराष्ट्रीय हॉकीपटू सानिका माने हिने २१ वर्षांखालील आशियाई चषक हॉकी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या कामगिरीमुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर पडली आहे. हॉकीचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी टर्फसह आवश्यक सोयी-सुविधांची गरज आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले.
आशियाई चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर कोल्हापूर येथील ‘पुढारी’ भवनमध्ये सोमवारी सानिका माने हिने आई-वडिलांसह सहकुटुंब डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. यावेळी ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने डॉ. जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व एक लाख रुपयांचा धनादेश देऊन तिचा सत्कार करण्यात आला. डॉ. जाधव म्हणाले, हॉकी खेळाडूंना सध्या मातीच्या मैदानावर सराव करावा लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हॉकी टर्फ मैदान उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. नूल ही हॉकी पंढरी आहे, या ठिकाणी हॉकीपटूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ, कसबा नूलचे चेअरमन कलाप्पाणा नडगदल्ली, संचालक काशीनाथ शिंदे, मुख्याध्यापक शैलापा साखरे, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी एस. आर. जाधव, न्यू इंग्लिश स्कूल, कौलगेचे बाळासाहेब मोहिते, वैभव शहा, दै. ‘पुढारी’चे सहायक समूह सरव्यवस्थापक अमित डिक्कर, ग्रुप हेड एचआर अँड ॲडमिन निशिकांत तायडे, रिजनल मॅनेजर ऑपरेशन्स अँड मार्केटिंग हरिष हिंगणे, असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाऊंटस् सौरभ पुराणिक, मॅनेजर एचआर अँड ॲडमिन बाहुबली बोगार, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, चीफ मॅनेजर वितरण रामकृष्ण लोकरे, हेड आयटी अँड डिजिटल विजय नाईक, मुख्य प्रतिनिधी अनिल देशमुख, सिनिअर अकाऊंटंट शिवाजी थोरबोले, सानिकाचे वडील चंद्रकांत माने, आई आणि राष्ट्रीय खेळाडू ज्योती माने, सुनंदा खानापुरे, अजित खानापुरे उपस्थित होते.
सर्वाधिक स्वातंत्र्य सैनिक देणाऱ्या नूल गावात आंतरराष्ट्रीय हॉकीपटू!
नूल गावाला स्वातंत्र्य सैनिकांच्या परंपरेचा गौरवशाली वारसा लाभला आहे. त्याचबरोबर हॉकी पंढरी अशी ओळख असलेल्या नूल या गावातील हॉकीपटू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. सानिकाच्या यशामुळे नूलची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचे गाव म्हणून निर्माण होईल, असा विश्वास दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केला.