कोल्हापूर : एखाद्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला दूरद़ृष्टी आणि परिश्रमाची जोड मिळाली की, त्याचे फळ मुदतीपूर्वी कसे हाती येऊ शकते, याचे पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट हे विशेष उल्लेखनीय उदाहरण आहे. भारतामध्ये इथेनॉल उद्योगाची मुहूर्तमेढ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखील यूपीए-2 सरकारने केली होती. केंद्र सरकारच्या या धोरणाला अनुसरून अनेकांनी देशात इथेनॉल उद्योग उभे केले. परंतु, सरकारने खुल्या बाजारात विकल्या जाणार्या रॉकेलपेक्षाही कमी भाव इथेनॉलला दिला आणि उद्योगाचे अर्थकारण बिघडून अनेक प्रकल्प भंगारात गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या नेतृत्वाखालील सरकारने मात्र दूरद़ृष्टी ठेवून धोरण जाहीर केले. उद्योगाला प्रोत्साहित केले. इथेनॉल निर्मिती उद्योगाने विशेषतः साखर कारखानदारीने मोठे परिश्रम घेतले. यामुळे भारत पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रणाची उद्दिष्टपूर्ती करू शकला. आता देशातील इथेनॉल उद्योगापुढे नवी कात टाकण्याचे आव्हान आहे. त्यांनी आपल्या एक पदार्थापासून इथेनॉलनिर्मिती करणार्या प्रकल्पाला बहुुपदार्थांपासून (मल्टिफिड स्टॉक) इथेनॉल निर्मिती प्रकल्पामध्ये रुपांतरित करण्याची आवश्यकता आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू झाली, तर इथेनॉल आघाडीवर भारताचा ब्राझील होण्यास वेळ लागणार नाही.
भारतामध्ये इथेनॉलचा विषय निघाला, तर साखर कारखानदारीचा चेहरा पुढे येतो. या कारखानदारीने इथेनॉल निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान दिलेच. परंतु, तांदूळ आणि मक्यापासून इथेनॉल निर्मिती करणार्या उद्योगांचेही यामध्ये मोठे योगदान आहे. किंबहुना 2024-2025 या इथेनॉल वर्षाचा विचार करता साखर कारखानदारीतून निर्माण झालेल्या (337 कोटी लिटर्स) इथेनॉलपेक्षा धान्यापासून (तांदूळ 107 कोटी लिटर्स, मका 485 कोटी लिटर्स) झालेली इथेनॉल निर्मिती अधिक आहे. या प्रक्रियेत इथेनॉल निर्मितीसाठी 40 लाख मेट्रिक टन साखर वळविण्यात आली, तर तांदूळ व मक्याचे प्रमाण अनुक्रमे 21 व 128 लाख मेट्रिक टन इतके आहे.
भारतात साखरेचा हंगाम 165 दिवस चालणे अपेक्षित आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत 120 ते 140 दिवसांतच हंगामाचे सूप वाजते आहे. याचा अर्थ परदेशातून कच्ची साखर आयात करून पक्की करण्याचा काही कारखान्यांचा अपवाद वगळला, तर सुमारे 550 साखर कारखान्यांच्या रुपाने गुंतविलेले काही लाख कोटींचे भागभांडवल किमान 200 दिवस विनावापर पडून राहते. साखर कारखान्यांकडे सध्या उसाचा रस, बी आणि सी हेवी मोलॅसिस यांच्यापासून इथेनॉल निर्मिती करणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेला मल्टिफिड स्टॉक उद्योगामध्ये रुपांतरित केले, तर यंत्रणेचा वापर शक्य होईल. शिवाय इथेनॉलच्या मूल्यवर्धित नफ्याच्या रूपाने कारखानदारीला उसाला चांगला दर देता येणे शक्य आहे. यामुळे कारखान्यांचे अर्थकारण सुदृढ तर होऊ शकते. शिवाय ऊस दराचे मोर्चेही कायमस्वरूपी थोपविता येणे शक्य आहे. (उत्तरार्ध)
साखर कारखानदारीत वा उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती करणार्या उद्योगांत सध्या ऊस या एकमेव घटकापासून इथेनॉल निर्मिती करण्याचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या रचनेमध्ये काही नाममात्र तांत्रिक बदल (स्टोअरेज, लिक्विफिकेशन, फरमेंटर) केले, तर हे प्रकल्प बहुपदार्थ (मल्टिफिड स्टॉक) इथेनॉल निर्मिती प्रकल्पामध्ये रुपांतरित करता येऊ शकतात. त्याचा लाभ घेण्याची हीच योग्य वेळ आहे.दीपक देसाई, अध्यक्ष, इथेनॉल इंडिया