शिरढोण/बिरु व्हसपटे
दिवाळीचा सण तोंडावर असतानाच खाद्य तेलाच्या किमतीत डब्यामागे सरासरी १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. तेलाचे भाव किलो मागे तब्बल २५ ते ३० रुपयांनी वाढले आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांच्या खिशाला लागणारी कात्री त्यांना न परवडणारी आहे. (Edible Oil price hike)
खाद्यतेलाचे भाव वाढल्याने स्वयंपाक घरातील फोडणी महागली असून, सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. केंद्र सरकारने कच्च्या व रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० रुपयांनी वाढ केली आहे. सोबत दोन टक्के सेल्स असे २२ टक्के वाढ झालेली आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २० टक्के वाढ, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले आहे, तर खाद्यतेलात अचानक किलोमागे २५ ते ३० रुपयांची वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
दिवाळीमुळे तेलाचा वापर वाढणार आहे. अशात खाद्यतेलाचे भाव किलोमागे २५ से ३० रुपयांनी वाढल्याने घरा-घरांत फोडणीचा ठसका उडत आहे. तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कच्च्या व रिफाइंड खाद्यतेलावरील मूळ आयात करात २२ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा करताच व्यापाऱ्यांनी खाद्य तेलाच्या किमती वाढवल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
१५ किलो डब्यामागे सरासरी १५० ते २०० रुपये वाढले आहेत. सूर्यफूल जुना दर १,७५० रुपयांचा डब्याचा होता, आताचे दर २,१४० रुपये, सोयाबीन डब्याचा जुना दर १,६०० रुपये व आताचे दर २०५० रुपये, पाम तेल जुना दर १,६०० व आताचे १,८५० रुपये दर आहेत.
ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी लोक राहतात. अस्मानी संकटाना तोंड देत उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना सध्या महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढतच असून ऐन दिवाळीच्या तोंडावर गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लागली जात आहे. या दरवाढीने ग्रामीण भागातील लोकांचे जीवन आर्थिक संकटात सापडले आहे.
- सुरेश सासणे, शिरढोण