Dust Particles and Lungs | धूलिकणांचा फुफ्फुसांवर ‘सायलेंट अटॅक’; राज्यात क्रॉनिक ब्राँकायटिसचा धोका! 
कोल्हापूर

Dust Particles and Lungs | धूलिकणांचा फुफ्फुसांवर ‘सायलेंट अटॅक’; राज्यात क्रॉनिक ब्राँकायटिसचा धोका!

मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख शहरांच्या हवेत सूक्ष्म धूलिकण हेच प्रमुख प्रदूषक

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : आपण रस्त्यावरून चालताना अचानक हवेत बदल जाणवतो. धुरसर वातावरण, दिव्यांभोवती अंधुक धुराचे वलय, रस्त्यांवरून उडणारी बेसुमार धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे निर्माण होणारी धुरकट हवा... हे केवळ दृश्य बदल नाहीत, तर आपल्या फुफ्फुसांवर होत असलेल्या अदृश्य हल्ल्याची चिन्हे आहेत. हवेत तरंगणारे सूक्ष्म धूलिकण श्वासावाटे शरीरात प्रवेश करून फुफ्फुसांमध्ये साचतात. प्रदूषणाचा हा सततचा संपर्क फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी करत श्वसनमार्गात सूज, खोकला, कफ आणि श्वास घेण्यास त्रास निर्माण करू शकतो. त्यामुळे हवा प्रदूषणाच्या या ‘सायलेंट किलर’मुळे क्रॉनिक ब्राँकायटिसचा धोका वाढल्याचे तज्ञांनी सांगितले.

धक्कादायक बाब म्हणजे २६ नोव्हेंबरच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह प्रमुख शहरांमध्ये धूलिकण हेच वायुप्रदूषणाचे प्रमुख घटक असल्याचे दिसून येत आहे. हवा प्रदूषणामुळे केवळ तात्पुरता खोकला किंवा घशाची खवखव होत नाही, तर दीर्घकाळ प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने क्रॉनिक ब्राँकायटिसचा धोका वाढू शकतो.

फुफ्फुसांत धूलिकण साठून सूज, कफ वाढतो; ब्राँकायटिसचा धोका

* पीएम २.५ चे अतिसूक्ष्म धूलिकण श्वासावाटे फुफ्फुसांच्या खोल भागांपर्यंत पोहोचून आतील पेशींना हानी पोहोचवतात

* धूलिकणांमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दाहक प्रतिक्रिया निर्माण होऊन श्वसनमार्गाला सूज येते

* दाहामुळे श्लेष्मा तयार करणाऱ्या पेशींची क्रियाशीलता वाढून कफनिर्मिती अधिक होते

* धूलिकणांमुळे श्वसनमार्गातील सिलिया (सूक्ष्म केसांसारख्या संरचना) यांच्या कार्यावर परिणाम होऊन कफ व धूलिकण बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते.

* प्रदूषणाचा दीर्घकालीन संपर्क खोकला, कफ, श्वास घेण्यास त्रास आणि क्रॉनिक ब्राँकायटिसचा धोका वाढवू शकतो.

प्रदूषणामुळे दमा, ब्राँकायटिस आणि श्वसनमार्गाचे संसर्ग वाढत असून, धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान झालेल्यांना अधिक त्रास होत आहे. अस्थमाचे अटॅक, लहान मुलांमधील वारंवार श्वसनसंसर्ग आणि ॲलर्जीग्रस्तांचा त्रासही वाढत आहे.
डॉ. अनिता सैबनवार, फुफ्फुसरोग तज्ज्ञ, सीपीआर, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT