Pune Bangalore NH4 traffic Pudhari Photo
कोल्हापूर

Pune Bangalore NH4 traffic : दुधगंगेच्या पुराचे पाणी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर; वाहतूक धिम्या गतीने सुरू

Dudh ganga river flood traffic: बेळगावहून कोल्हापूरकडे जाणारी एकेरी वाहतूक पूर्णपणे थांबली नसली तरी, महामार्गावरील पाण्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत

पुढारी वृत्तसेवा

मधुकर पाटील

निपाणी: कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीचे पाणी आता पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागल हद्दीतील आयबीपी पेट्रोल पंपाजवळ आल्याने आंतरराज्य वाहतुकीचा वेग मंदावला आहे. बेळगावहून कोल्हापूरकडे जाणारी एकेरी वाहतूक पूर्णपणे थांबली नसली तरी, पाण्यामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सद्यस्थिती आणि कारण

तळकोकणात पावसाचा जोर वाढल्याने प्रमुख धरणांमधून दूधगंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पात्राबाहेर पडलेले पाणी महामार्गाच्या पश्चिमेकडील लेनवर पसरले आहे. सध्या या पाण्यातूनच बेळगावहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

प्रशासकीय सज्जता आणि वाहतुकीचे नियोजन

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी कोगनोळी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास आणि पश्चिमेकडील मार्ग पूर्णपणे बंद झाल्यास, खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गाच्या पूर्वेकडील लेनवरून दुहेरी वाहतूक (One-Way Diversion) सुरू करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. सध्या वाहतूक सुरू असली तरी, प्रवाशांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामगार आणि नागरिकांचे हाल

महामार्गावर पाणी आल्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांना बसला आहे. सीमाभागातून दररोज कागल आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणाऱ्या अनेक कामगारांना महामार्गावरील पाण्यामुळे प्रवास रद्द करून घरी परतावे लागले. यामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि पाण्याची पातळी आणखी वाढल्यास राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT