कोल्हापूर : कर्नाटक एसटीमध्ये प्रवाशांना त्रास देताना हटकल्याच्या रागातून मद्यधुंद असलेल्या एका प्रवाशाने एसटीच्या वाहक व चालकास मारहाण केली. विनोद राजाराम सूर्यवंशी (रा. उपळावी, तासगाव, जि. सांगली) असे मारहाण करणार्या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. वाहक महेंद्र धनेंद्र पारिशवाडा (वय 57, रा. बेनगल, बेळगाव) यांनी याबाबतची फिर्याद दिली.
कर्नाटक राज्याच्या बेळगावहून मुंबईकडे निघालेल्या बसमध्ये संकेश्वर येथे संशयित विनोद सूर्यवंशी बसला. सायंकाळी कोल्हापूरजवळ बस पोहोचण्यापूर्वी तो वारंवार जागा बदलत होता. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने बसमधील अन्य प्रवाशांनी त्याची तक्रार वाहक पारीशवाडा यांच्याकडे केली. त्यांनी दोन ते तीन वेळा त्याला समज दिली. बस कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आली असताना संशयित सूर्यवंशीने पुन्हा वाद केला. वाहकासह चालक इकबाल जमादार, अशोक आत्तरकी यांनाही दमदाटी करत मारहाण केली. वाहकाच्या गळ्यातील ई-तिकीटचे मशिन काढून घेत जमिनीवर आदळून फोडले. बस थेट शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या दारात आणत संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.