कोल्हापूर : भाजी चिरण्याच्या वादातून मद्यपीने मित्राचाच चाकूने भोसकून खून केला. मंगल बिभीषण मांझी (वय 35, सध्या रा. संभापूर, मूळ रा. ओडिशा) असे मृताचे नाव आहे. संभापूर (ता. हातकणंगले) येथे सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी देवश्री प्रफुल्ल चंदन (26, रा. सध्या रा. संभापूर, मूळ रा. ओडिशा) याला अटक केली.
मांझी व चंदन मूळचे ओडिशाचे आहेत. मात्र मांझी गेल्या वीस वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात राहत होता. गवंडी काम करून तो उदरनिर्वाह करत होता. सध्या तो आई, भावासह संभापूर येथे राहत होता. त्याची पत्नी आणि मुले ओडिशा राज्यात आहेत. वर्षातून दोन-चार महिने तो ओडिशाला जात होता. तर चंदन हा सुध्दा गवंडी काम करतो. दोघांच्या खोल्या शेजारी -शेजारी आहेत. सोमवारी सुट्टी असल्याने मांझी याच्या खोलीत दोघे रात्री दारू प्यायले. त्यानंतर ते जेवण करत होते. भाजी करताना दोघांत वाद झाला. मांझी हा मी भाजी करणार म्हणत होता, तर चंदन त्याला अडवून मीच भाजी करणार असे म्हणत होता. त्यातून दोघांत जोरदार वादावादी झाली.
चंदनने भाजी चिरण्याच्या चाकूने मांझी याला भोसकले. त्याच्यावर चार-पाच पोटात खोलवर वार केले. मांझी खोलीतच कोसळला. दोघांतील आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक मांझी याच्या खोलीकडे धावले. मांझी रक्तबंबाळ अवस्थेत खोलीत पडला होता. त्याच्या भावाने तत्काळ नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले, परंतु येथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथेच दारूच्या नशेत धुंद असलेल्या चंदनला अटक केली.