सुनील कदम
कोल्हापूर : आजपर्यंत केवळ शहरांपुरती मर्यादित असलेली ड्रग्जची गटारगंगा गेल्या काही दिवसांपासून शहरांमधून खेड्याकडे वाहताना दिसत आहे. परिणामी राज्याच्या ग्रामीण भागातील युवा पिढीची वाटचालही आजकाल या विषारी वाटेने होताना दिसत आहे.
पूर्वी राज्यातील लोकांना ड्रग्जची ओळख ही केवळ हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून व्हायची. ओळख व्हायची म्हणजे केवळ या नशिल्या पदार्थांची नावे समजायची. कालांतराने 1980 च्या दशकापासून बॉलीवूडमध्ये प्रत्यक्ष ड्रग्जचा वापर सुरू झाला. कालांतराने हे लोण प्रामुख्याने शहरी भागातील उच्चभ्रू वर्गात पसरले. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत ड्रग्जने आपले हातपाय पसरत एक एक शहर काबीज करीत शहरी भागात बस्तान बसविले. रेव्ह पार्ट्या हे ड्रग्जच्या गटार गंगेतूनच बाहेर पडलेले ‘बायप्रॉडक्ट’ आहे.
मागील दोन-तीन वर्षांपासून मात्र ड्रग्जचे हे लोण ग्रामीण भागाकडे सरकताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ड्रग्जचे छोटेखानी कारखानेच आढळून आले होते. या ठिकाणी तयार होणार्या ड्रग्जचा सर्वत्र पुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिकच्या ग्रामीण भागात नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शन्सचा मोठा साठा आढळून आला होता. धोकादायक बाब म्हणजे आजकाल ग्रामीण युवा पिढी मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या आहारी जाताना दिसत आहे.
कोणत्याही ड्रग्जच्या आहारी जाणार्यांमध्ये जवळपास सारखीच लक्षणे दिसू लागतात. ड्रग्जची चटक लागलेली व्यक्ती सुरुवातीला काही दिवस सतत उत्साही दिसते. पण नंतर अवघ्या काही दिवसांतच त्या व्यक्तीची झोप व भूक गायब होते, हाडाची काडे होताना दिसू लागतात, कायम चिडचिड, रागावून कुणावरही भडकणे, सततची डोकेदुखी, अचानक रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, ताप येऊन धाप लागणे आणि अचानकपणे अंग गार पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. ड्रग्जच्या आहारी गेलेली व्यक्ती ड्रग्ज मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. खिशात पैसे नसतील तर चोरी करतील, मारामारी करतील, खोटे बोलतील, आणखी काही म्हणजे काहीही करतील; पण कधी एकदा ड्रग्ज मिळवून त्याची चव चाखतो असे त्यांना होते.
ग्रामीण भागात प्रामुख्याने मॅफेड्रॉनला अधिक मागणी असल्याचे दिसून येते. पण ही वाट थेट यमलोकी नेणारी आहे, याची अनेकांना जाणीव नसते. मॅफेड्रॉनचे सलग दोन-चार डोस घेतले की ती व्यक्ती त्या व्यसनाच्या अधीन होते. एकदा का त्याची चटक लागली की या व्यसनाच्या आहारी गेलेल्यांच्या डोसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते आणि अवघ्या दोन वर्षांच्या आत ती व्यक्ती मृत्युमुखी पडते. या व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना व्यसनाच्या पहिल्या टप्प्यात असेल तर त्यातून बाहेर काढणे शक्य होते. मात्र ती वेळ निघून गेली असेल तर काही उपाय चालत नाही. तेव्हा आपली लेकरे-बाळे या मृत्युपंथावर तर वाटचाल करीत नाही ना, याची दक्षता घ्या!