HIV drug-free control | ‘एचआयव्ही’बाधितांसाठी विषाणूंवर औषधाशिवाय नियंत्रण? file photo
कोल्हापूर

HIV drug-free control | ‘एचआयव्ही’बाधितांसाठी विषाणूंवर औषधाशिवाय नियंत्रण?

कॅलिफोर्निया, सॅन फ्रॅन्सिस्को विद्यापीठांचे संशोधन

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : देशातील एड्सबाधित रुग्णांसाठी दिलासा देणारे एक वृत्त आहे. औषधांची उपलब्धता, त्यांचे दुष्परिणाम आणि त्यावर होणारा खर्च याचबरोबर मानसिक तणावाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आता एक नवीन उपचार पद्धती विकसित झाली आहे. यामुळे रुग्णांना दीर्घकाळ औषधांशिवाय आपला आजार नियंत्रणात ठेवता येणे शक्य होणार आहे. जगप्रसिद्ध ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये हा संशोधन अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. हे संशोधन ‘एचआयव्ही’च्या उपचार पद्धतीमध्ये मैलाचा दगड ठरू शकते.

कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रॅन्सिस्को (यूसीएसएफ) आणि सहकारी संस्थांच्या संशोधकांनी एक नवीन संयुक्त रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारी उपचार पद्धती (इम्युनोथेरपी) यामध्ये प्रतिपिंडे आणि टी-सेल्सचा वापर केला जातो. या उपचार पद्धतीने विषाणूंचे नियंत्रण काही महिने औषधांशिवाय टिकून राहिल्याचे नोंदविले गेले आहे. या समूहाने आपल्या संशोधनासाठी ‘एचआयव्ही’सह जगणार्‍या एका लहान गटावर बहुघटक इम्युनोथेरपीची चाचणी केली. ज्यामध्ये ब्रॉडली न्यूट्रलायझिंग अँटिबॉडीज् (बीएनएबीएस) आणि टी-सेल्स यांचा वापर करण्यात आला. या प्रयोगात अनेक सहभागींमध्ये विषाणूचा प्रसार अत्यंत मंदगतीने आणि कमी प्रमाणात दिसला. त्यांच्या प्रतिकारकशक्तीने औषधोपचार थांबवूनही विषाणूंना दाबून ठेवण्यात यश मिळविले. एका रुग्णामध्ये तर 18 महिन्यांहून अधिक कालावधीपर्यंत कोणतेही ‘एचआयव्ही’ नियंत्रणाचे औषध (अँटिरिट्रोव्हायरल) न घेताही विषाणू नियंत्रणात राहिल्याचा निष्कर्ष आहे. ही संयुक्त थेरपी शरीरातील नैसर्गिक प्रतिकारकशक्तीला पुन्हा प्रशिक्षित करत असल्याच्या निष्कर्षापर्यंत संशोधक आले आहेत.

भारतामध्ये 1986 साली ‘एचआयव्ही’च्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले. चेन्नई येथील डॉ. सुनिती सोलोमॉन यांच्याकडे या रोगनिदानाचे श्रेय जाते. परंतु, त्यांना गुरुस्थानी असलेल्या सेलेप्पन निर्मला या सूक्ष्म जीवशास्त्रज्ञांनी 1980 मध्येच त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या रक्तनमुन्यांतून 30 नमुने ‘एचआयव्ही’बाधित असल्याचे भारत सरकारला कळविले होते. यानंतर भारतात ‘एचआयव्ही’ ही आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यावर नियंत्रण आणणारी अनेक औषधे बाजारात आली. परंतु, अद्यापही ‘एचआयव्ही’ विषाणूंसोबत जीवन जगणार्‍या भारतातील रुग्णांची संख्या सुमारे 36 लाख इतकी आहे. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन या राष्ट्रीय संस्थेचीच ही आकडेवारी आहे. एड्स या रोगाला नियंत्रणात ठेवणारी औषधे बाजारात आली. त्यामुळे रुग्णांचे आयुर्मान वाढले. परंतु, औषधे आणि मानसिक ताण यांचे रुग्णांच्या मानेवरील जोखड काही कमी होत नाही. याला हे नवे संशोधन पूरक ठरणारे आहे.

अँटिबॉडीज् आणि टी-सेल्स यांच्या या उपचार पद्धतीने ‘एचआयव्ही’बाधित रुग्णांसाठी एक मोठा आशेचा किरण दाखविला आहे. ही उपचार पद्धती अत्यंत कमी खर्चिक आहे. यामुळे या संशोधनावर अंतिम शिक्कामोर्तब झाले, तर ‘एचआयव्ही’बाधित रुग्णांची औषधांचा खर्च, दुष्परिणाम, सामाजिक कलंक यापासून मुक्तता होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT