Drug trafficking concerns | ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना औषधेही पुरेनात! 
कोल्हापूर

Drug trafficking concerns | ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना औषधेही पुरेनात!

वेगवेगळ्या औषधांचा नशाखोरीसाठी वापर; ग्रामीण भागात नशेचे सार्वजनिक अड्डे

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांना काहीही करून व्यसनांची पूर्तता करायची चटकच लागते. ग्रामीण भागात सहजासहजी हवे ते ड्रग्ज उपलब्ध झाले नाही तर ही मंडळी चक्क वेगवेगळ्या औषधांचा वापरच नशेसाठी करताना दिसतात. ग्रामीण भागात नशेचे सार्वजनिक अड्डे बनले आहेत.

शहरी भागात आजकाल सर्रास कुठेही कोणतेही ड्रग्ज उपलब्ध होते. मात्र, ग्रामीण भागात अद्याप ही ‘सुविधा’ हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाही. पण ड्रग्जच्या आहारी गेलेल्या अशा लोकांना कधी एकदा ‘झिंगतो’ असे होऊन जाते. अशावेळी ही मंडळी नशेसाठी कशाचा वापर करतील याचा नेम नाही. आजकाल ग्रामीण भागात वेगवेगळ्या औषधांचा वापर नशेसाठी होताना दिसत आहे. कोणत्याही औषधात अल्प प्रमाणात का होईना कोणता ना कोणता अमली पदार्थ हा असतोच. नेमकी ही बाब हेरून ग्रामीण भागात आजकाल वेगवेगळ्या औषधी गोळ्या, औषधी पेये आणि इंजेक्शन्सचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू झालेला दिसतो आहे.

ही औषधे देतो कोण?

नशेसाठी जी औषध वापरली जातात, ती औषधे प्रामुख्याने धोकादायक वर्गात मोडतात. या औषधांचा डोस थोडा कमी अधिक झाला तर जीवावर बेतू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे विकताच येत नाहीत. पण काही औषध विक्रेते दाम-दसपट मोबदल्याच्या हव्यासापोटी अशी औषधे नशेखोरांना उपलब्ध करून देत आहेत. औषधांचा असा बेकायदेशीर व्यापार करणार्‍या विक्रेत्यांवरही कारवाई होण्याची आवश्यकता आहे.

गांजा, अफू, चरस सारं काही उपलब्ध

राज्याच्या ग्रामीण भागात फोफावत असलेल्या अंमली पदार्थांचे स्वरूप आणि प्रकारही वेगवेगळे आहेत. नैसर्गिक अमली पदार्थांमध्ये प्रामुख्याने अफू, चरस आणि गांजा यांचा समावेश होतो. अफू गुजरातमधून तर चरस जम्मू-काश्मिरमधून येते. गांजासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही. कारण पश्चिम महाराष्ट्रात आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात गांजाची आगारेच्या आगारे आढळून येतात. गांजाची ही नशा केल्याचे फारसे कुणाला ओळखू येत नसल्याने युवापिढीतील काहीजण अलिकडे ‘गांजाडू’ होण्याचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांमध्ये गांजाचे हे प्रमाण इतके वाढले आहे की आजकाल क्विंटलने गांजा विक्री होताना दिसत आहे. गेल्या महिन्याभरातील पोलिस कारवाईतून हे दिसूनच आले आहे.

विदेशी अमली पदार्थांचीही खेड्यापाड्यापर्यंत पोहोच

हेरॉईन, ब्राऊन शुगर, सिंथेटिक ड्रग, केटामाईन, मॅफेड्रॉन, एम्फेटामाईन, कॅथिनॉन या अमली पदार्थांची नावेसुध्दा कधी ग्रामीण भागाला माहीत नव्हती आणि आजही त्यांची खरी नावे या नशेखोरांना माहीत नाहीत. पण वेगवेगळ्या नावांनी हे अमली पदार्थ ग्रामीण भागातही उपलब्ध होताना दिसत आहेत. या अमली पदार्थांची काही देशी उगमस्थाने असली तरी प्रामुख्याने त्यांची आयात परदेशातून केली जाते. पावडर, गोळ्या, द्रवरूप, वायुरूप आणि इंजेक्शनच्या रूपात हे अमली पदार्थ मिळतात. मात्र, त्याच्या किमती ग्रामीण भागातील नशेखोरांच्या आवाक्याबाहेर असल्याने ही मंडळी ‘स्वस्तात मस्त’ म्हणून हाताला लागेल त्या अमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT