वारणानगर : राज्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ३२ व्या पुण्यस्मरणानिमित्त वारणानगर येथे १३ डिसेंबरला होणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानासह कृषिप्रदर्शनासह सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्याऐवजी शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी चाऱ्याची विशेष योजना राबविणार असल्याची माहिती वारणा समूहाचे प्रमुख, आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. १३ डिसेंबरला तात्यासाहेब कोरे यांच्या ३२ व्या स्मृतिदिनी समाधीचे पूजन, सद्भावना दौड, महाप्रसाद इतकेच कार्यक्रम होणार आहेत. दुष्काळ परिस्थितीतमुळे वारणा कृषिप्रदर्शन, ऊसभूषण पुरस्कार, सावित्री लक्ष्मी पुरस्कार वितरण व विलासराव कोरे तंत्रज्ञ पुरस्कार व आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान यावेळी होणार नाहीत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. याचा विचार करून वारणा समूहाने शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी संकल्प केला आहे. १३ डिसेंबरला वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर शेतकऱ्यांना चारा पुरविणारा पीएमआर प्रकल्प सुरू होणार आहे. या प्रकल्पात दररोज सुमारे ३० टन चारानिर्मिती होणार आहे.
साखर कारखाने बंद झाल्यानंतर वैरणटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे वारणा समूह सुमारे ३० हजार टन वैरण उपलब्ध करणार आहे. दुष्काळाशी सामना करण्यासाठी वारणा समूहाने विविध कार्यक्रम हाती घेतले असल्याचेही डॉ. कोरे यांनी सांगितले. यावेळी समन्वयक प्रा. जीवनकुमार शिंदे उपस्थित होते.