आशिष शिंदे
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची प्रत्येक हालचाल आता टिपली जाणार आहे. व्याघ्र प्रकल्पावर ड्रोनद्वारे डिजिटल नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक कॅमेर्यांचे नेटवर्क उभारण्यात येत आहे. यामुळे जंगलातील प्राण्यांच्या हालचाली, जखमी प्राणी किंवा अवैध मानवी शिरकाव तत्काळ ओळखणे सोपे होणार आहे. हायटेक ट्रॅकिंग सिस्टीममुळे अधिवासातील प्राण्यांचे दैनंदिन पॅटर्न समजण्यास मदत होईल. याशिवाय जंगलातील वणव्यांवरही सॅटेलाईटद्वारे नजर ठेवली जाणार आहे. या संपूर्ण प्रणालीमुळे मानवी वन्यजीव संघर्ष रोखण्यास मोठी मदत होईल, असे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकार्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत जैवविविधतेवर मानवी दबाव, अतिक्रमण, रस्तेविस्तार, जलस्रोतांमध्ये कमी झालेली उपलब्धता आणि अधूनमधून होणारे मानवी वन्यजीव संघर्ष वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू (आरईएसक्यू) चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन आणि आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवांसंदर्भातील सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार, प्रशिक्षित पशुवैद्यक आणि तांत्रिक तज्ज्ञांची टीम ड्रोन सव्हिर्र्लन्स, एआयआधारित मूव्हमेंट ट्रॅकिंग, डेटा मॉनिटरिंग आणि पोस्ट रीलिज फॉलोअप यासारख्या प्रणालींनी सज्ज होणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागात असलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर अभयारण्यातही या क्षमतांचा वापर केला जाणार आहे.
जंगलातील सर्व्हिलन्स अधिक प्रभावी करण्यासाठी नॉर्मल कॅमेरे, हाय रिझॉल्युशन डीएसएलआर, पीटीझेड युनिटस्, इन्फ्रारेड कॅमेरे आणि ड्रोन यांचे नेटवर्क उभारण्यात येणार आहे. यातून रात्रीच्या हालचाली, अवैध मानवी शिरकाव, जखमी किंवा संकटात सापडलेले प्राणी, तसेच प्रजातींचे वर्तन वैज्ञानिक आणि अचूक पद्धतीने निरीक्षण करता येईल. एआयआधारित निरीक्षण प्रणालीमुळे वनक्षेत्रातील हालचालींचे रिअल टाईम नकाशे तयार होऊन हरीण, बिबट्या, अस्वल यासारख्या प्राण्यांच्या मार्गांचा डेटा मिळेल. यातून संघर्षप्रवण झोन ओळखणे अधिक सोपे होणार आहे.
डेटा मॉनिटरिंग प्रणाली प्रजातींच्या आरोग्य, स्थलांतर पद्धती, मृत्यू दर यांचे वैज्ञानिक विश्लेषण करेल. याच डेटावर आधारित भविष्यातील संवर्धनाचे निर्णय घेता येतील. पोस्ट रीलिज मॉनिटरिंगमुळे, चांदोलीत हलवलेल्या 79 चितळांप्रमाणे, पुढील काळात स्थलांतरित किंवा उपचारांनंतर जंगलात सोडलेल्या प्राण्यांचे आरोग्य, हालचाल आणि नव्या गटात समायोजन यांचे निरीक्षण अचूकपणे करता येईल.