Bus Accident | धावत्या बसचे चाक डळमळले; चालकाच्या सतर्कतेने संकट टळले! 
कोल्हापूर

Bus Accident | धावत्या बसचे चाक डळमळले; चालकाच्या सतर्कतेने संकट टळले!

शाहू खासबाग मैदानाजवळची घटना; बसमधील सर्व प्रवासी सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पापाची तिकटी येथे धावत्या केएमटी बसचे चाक निखळून मोपेडचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी शहरात पुन्हा अशाच प्रकारची घटना घडली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा अपघात टळला. शाहू खासबाग मैदानाजवळ केएमटी बसचे मागील चाक डळमळत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबविली. त्यामुळे बसमधील सुमारे ३० ते ४० प्रवासी सुखरूप राहिले.

एमएच-०९-सीव्ही-४८७ क्रमांकाची केएमटी बस कळंबा येथून पेठवडगावकडे जात होती. संध्याकाळची गर्दीची वेळ असल्याने बसमध्ये सुमारे ३० ते ४० प्रवासी होते. मिरजकर तिकटी ओलांडल्यानंतर काही अंतरावर बसच्या मागील चाकामध्ये असामान्य हालचाल होत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने तत्काळ बस थांबवून चाकाची तपासणी केली. तपासणीदरम्यान चाकाचे नट-बोल्ट सैल झाल्याचे आढळून आले. चालकाने तत्काळ केएमटी कार्यशाळेशी संपर्क साधून पर्यायी बस मागविली. त्यानंतर प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या बसमधून पेठवडगावच्या दिशेने रवाना करण्यात आले. दरम्यान, कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन चाकाचे नट-बोल्ट आवळून बस दुरुस्त केली.

बसची नियमित तपासणी आवश्यक

दोन दिवसांपूर्वी पापाची तिकटी येथे धावत्या केएमटी बसचे चाक निखळून एका मोपेडचे नुकसान झाले होते. त्यानंतरही अशा प्रकारची घटना घडल्याने केएमटी बसच्या देखभाल व तांत्रिक तपासणीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बसची नियमित तपासणी अधिक काटेकोरपणे करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT