kolhapur Theft Case : मालकाच्या 44 तोळे दागिन्यांवर चालकाचाच डल्ला Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur Theft Case : मालकाच्या 44 तोळे दागिन्यांवर चालकाचाच डल्ला

अवघ्या 12 तासांत ठोकल्या दोघांना बेड्या; दागिन्यांसह 50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सम्राटनगरातील उद्योजक राजीव जयकुमार पाटील यांच्या बंगल्यात गुरुवारी भरदिवसा झालेल्या सशस्त्र चोरीचा शुक्रवारी पोलिसांनी छडा लावला. चालकानेच मालकाच्या 44 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले. चालकासह त्याच्या साथीदाराला अवघ्या 12 तासांत बेड्या ठोकत दोघांकडून 50 लाख 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. प्रकाश दत्तात्रय चौगुले (वय 38, रा. हंचनाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) व अमित विश्वनाथ शिंदे (25, यादवनगर, डवरी वसाहत, कोल्हापूर) या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांनी दिली.

सम्राटनगर येथे पाटील यांचा बंगला आहे. गुरुवारी ते कुटुंबीयांसह गोकुळ शिरगाव येथील आपल्या फर्ममध्ये गेले होते. घरात त्यांचा एकच वृद्ध नातेवाईक होता. दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास दोन हेल्मेटधारी बंगल्यात घुसले. त्यांनी बंगल्यातील वृद्धाला चाकूचा धाक दाखवत बेडरूममधील कपाटात सोन्याचे दागिने, रोकड ठेवलेले तीन डिजिटल लॉकर घेऊन मोपेडवरून धूम ठोकली. या घटनेची राजारामपुरी पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा नोंद झाली. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने तपास सुरू केला.

बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असणार्‍या चाव्या घेऊन ही चोरी करण्यात आल्याने चोरटे माहीतगार असावेत, या शक्यतेने पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी सहा वर्षांपासून चालक म्हणून काम करणारा प्रकाश चौगुले याचा मोबाईल बंद आढळला. त्याचा शोध घेऊनही ठावठिकाणा सापडत नव्हता. सीसीटीव्हीतील फुटेजमधील चोरट्यांच्या हालचालीने प्रकाशवरील संशय बळावला. त्यात पोलिस अंमलदार सुरेश पाटील यांनाही प्रकाश यानेच साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती मिळाली.

प्रकाश पुणे-बंगळूर महामार्गावर येणार असल्याची माहिती मिळताच मध्यरात्री सापळा रचला. लक्ष्मी टेकडीजवळ तो मोटारीतून येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

कर्ज फेडण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी रचला कट

प्रकाश याची गॅरेजमध्ये काम करणार्‍या अमित याच्याशी ओळख झाली होती. दोघेही कर्जबाजारी होते. मोठी चोरी करून कर्ज फेडून उरलेल्या रकमेतून व्यवसाय करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी त्यांनी कट रचला. नेहमी बंगल्यात येणे-जाणे असल्याने प्रकाशला बेडरूममधील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने, रोकड असल्याची माहिती होती. घरात कोणी नसल्याचे समजताच गुरुवारी त्यांनी डल्ला मारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT