कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकर्यांना पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण व्हावा, पिकांना नियमित आणि आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांसाठी 80 टक्के अनुदानावर ठिबक सिंचन योजना जाहीर केली आहे. यासाठी मागील वर्षीच्या हंगामात शेतकर्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यातून तब्बल 4 हजार 246 शेतकर्यांची यासाठी कृषी विभागाने निवड केली होती. त्यापैकी 1 हजार 965 शेतकर्यांनी योजना राबविण्यास होकार कळवला आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात 930 शेतकर्यांनी योजना राबवली आहे. या योजनेचा निधी संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे.
शासनाच्या कृषी विभागाकडील योजनेतून ठिबक, तुषार सिंचन योजना जाहीर केली आहे. यासाठी 20 गुंठ्यांपेक्षा जास्त व 5 हेक्टरपर्यंत क्षेत्रापर्यंतची मर्यादा आहे. ठिबक सिंचन योजनेखाली क्षेत्र वाढावे आणि शेतकर्यांच्या उत्पन्नात भर पडावी, यासाठी ही योजना आहे. सध्या शेतकरी पिकासाठी सरी वरंब्यापर्यंत पाणी देण्याची पद्धत अवलंबतो. या पद्धतीने पिकाला पाणी दिल्याने जास्त पाणी वाया जाते. त्यामुळे ही पद्धत बंद व्हावी, पाण्याची काटकसरीने वापर करण्याची शेतकर्यांना सवय लागावी, या उद्देशाने सरकारने ठिबक सिंचन योजना सुरू केली आहे.
या योजनेत जास्तीत जास्त शेतकर्यांना सहभाग घेता यावा, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले येत आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातील 4 हजार 246 पैकी 1965 शेतकर्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 1965 शेतकर्यांनी या योजनेसाठी होकार दर्शवला आहे. यातील आतापर्यंत 960 शेतकर्यांना सुमारे एक कोटीवर अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकर्यांना शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर ते शेतकर्यांना देण्यात येणार असल्याचे कृषी अधिकार्यांनी सांगितले. या योजनेतून सुमारे 800 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र पाण्याखाली येणार आहे.
असे मिळणार अनुदान
अल्प व अत्यल्प शेतकर्यांना केंद्र सरकारकडून 55 टक्के राज्य शासनाकडून 45 टक्के अनुदान दिले जाते, तर अन्य शेतकर्यांना केंद्र सरकारकडून 45 व राज्य शासनाकडून 30 टक्के व पूरक अनुदान देण्यात येणार आहे.
लकी ड्रॉ पद्धतीने होते निवड
जिल्ह्यातील ऑनलाईन पद्धतीने 4 हजार 246 अर्ज दाखल, त्यापैकी 1965 शेतकर्यांनी योजनेसाठी होकार दर्शवला.
तालुकानिहाय पात्र शेतकरी
हातकणंगले 588, शिरोळ 640, पन्हाळा 166, कागल 213, करवीर 118, गडहिंग्लज 109, भुदरगड 10, आजरा 44, गगनबावडा 13, शाहूवाडी 25, राधानगरी 15.
शेतकर्यांचा कमी प्रतिसाद
या योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांची तालुकानिहाय आकडेवारी पाहिली असता. योजनेला येणारा प्रत्यक्षात खर्च, जमीन धारणा, छोट्या छोट्या वाफ्यामुळे ठिबकची यंत्रणा उभी करण्यास येणार्या अडचणी. यामुळे सुविधेपेक्षा कटकटीच जास्त, यामुळे अनेक शेतकर्यांना या योजनेत सहभाग घेण्यास नकार दर्शवल्याचे चित्र आहे.