Eye Health
कोल्हापूर ः मोबाईलचा अतिवापर हा डोळ्यांसाठी आपत्तीच आहे. यामुळे मोबाईलचा अतिरेक थांबवा आणि डोळे वाचवा असा मौलिक सल्ला प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मंगळवारी दिला. दैनिक ‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्यावतीने डॉक्टर्स डेनिमित्त शाहू स्मारक भवन येथे झालेल्या व्याख्यानमालेत ‘डोळे आणि आरोग्य’ या विषयावर ते बोलत होते.
शेवगा, हिरव्या पालेभाज्या नियमित खा. गाजराचा रस घ्या. सोपा व्यायाम करा. मोबाईलपासून शक्य तितके दूर राहा आणि आपले डोळे सदैव चांगले ठेवा असा निरोगी डोळ्यांचा कानमंत्र त्यांनी दिला. डोळ्यांचे आरोग्य उलगडताना त्यांनी कोल्हापूरकरांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याची माहिती सोप्या भाषेत दिली. पावसातही कोल्हापूरकरांनी या व्याख्यानमालेला उत्स्फूर्त गर्दी केली होती. शरीरातील एखादा अवयव खराब झाल्यास काढून टाकण्यास किंवा प्रत्यारोपण करण्यास आपण लाखो-करोडो रुपये खर्च करतो; पण हेच अवयव शरीरात असताना त्यांची किंमतच करत नाही. योग्य काळजीही घेत नाही. हेच आपले मोठं दुर्भाग्य असल्याचे सांगत डॉ. लहाने म्हणाले, डोळे हा शरीराचा सर्वात मौल्यवान अवयव आहे. आपल्याला 82 टक्के ज्ञान डोळ्यांमधून मिळते. डोळ्यांमुळेच आपण जग पाहतो; मात्र डोळ्यांची योग्य काळजी न घेतल्याने त्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत.
लहान वयात वाढणारा ताण-तणाव, चुकीचा आहार, गोड पदार्थांचे अतिसेवन यामुळे मधुमेहाची समस्या वाढत आहे, असे सांगत डॉ. लहाने म्हणाले, मधुमेहामुळे देशात 12 टक्के लोकांना अधंत्वाची समस्या निर्माण होत आहे. मधुमेह झाल्यानंतर डोळ्यांवर परिणाम दिसायला साधारण दहा वर्षे लागतात आणि त्यानंतर हळूहळू डोळे निकामी होतात. गोडाचे प्रलोभन शरीरासाठी घातक ठरत आहे, असे सांगत पुढे ते म्हणाले, आपण जिभेचे चोचले पुरवता पुरवता शरीराचे वाटोळे करत आहोत. अशा प्रकाराची गरजच काय? मधुमेहग्रस्त लोकांनी तांदूळ, मैदा यासह रक्तातील साखर वाढवणारे गोड पदार्थ टाळले पाहिजेत.
मोबाईलच्या अतिवापर हा डोळ्यांसाठी आपत्तीच आहे, असे सांगत डॉ. लहाने म्हणाले, यामुळे डोळ्यांत कोरडेपणा, धूसर दिसणे, डोळ्यांची लांबी वाढणे, डोळे वाकडे होणे आणि थकवा वाढणे असे प्रकार होत आहेत.
एक दिवस मोबाईलचा उपवास करा, असे सांगत डॉ. लहाने म्हणाले, मोबाईलचा अतिरेक थांबवला नाही, तर पुढील दहा वर्षांत समाजाचे आणि विशेषतः लहान मुलांचे मोठे नुकसान होणार आहे. मोबाईल ही सुविधा आहे; पण त्याचा गुलाम होता कामा नये. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांत कोरडेपणा, धूसर दिसणे, डोळ्यांची लांबी वाढणे, डोळे वाकडे होणे आणि थकवा वाढत आहेत. एका अभ्यासात 50 टक्के मुलांना डोळ्यांचा त्रास होत असून 65 टक्के मुलांची एकाग्रता आणि हुशारी कमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
माझ्या यशात तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या दूरद़ृष्टीमुळे राज्यभरात 40 खाटांच्या नेत्र रुग्णालयांचे जाळे उभे राहिले आणि मोतिबिंदू उपचाराच्या पद्धतीत क्रांती घडली. त्यामुळेच मी येथे येऊन व्याख्यान देण्याने आनंदून गेलो.
‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव म्हणाले, डॉ. तात्याराव लहाने हे केवळ नेत्रतज्ज्ञ नाहीत, तर ईश्वराचा खरा अंश आहेत. ‘पुढारी’ गेली 85 वर्षे महाराष्ट्राच्या बांधणीच्या प्रत्येक टप्प्याचा साक्षीदार राहिला आहे. समाजासाठी समर्पित भावनेने काही उत्तुंग काम करायचे हा ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डॉ. लहाने यांच्यातील समान दुवा आहे.
व्याख्यानमाला समन्वयक डॉ. संदीप पाटील म्हणाले, आरोग्य हीच एकमेव गोष्ट बाजारात विकत मिळत नाही. हे आरोग्य टिकवण्यासाठी ही व्याख्यानमाला गेली 22 वर्षे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यावेळी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता म्हणाले, आरोग्यासाठी कोल्हापूरचे वातावरण चांगले आहे. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. व्यासपीठावर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे झाली.
कमी नेटवर्कमध्ये मोबाईल वापरू नका. यावेळी मोबाईल जास्त रेडिएशन सोडतो. मोबाईल दोन बोटांनी मोकळा धरा. मोबाईल संपूर्ण हाताने झाकू नका, अन्यथा रेडिएशन थेट मेंदूकडे जाते. 1 ते 6 वयाच्या मुलांना मोबाईल देऊ नये. 6 ते 20 वयोगटातील मुलांना दिवसाला जास्तीत जास्त 1 तास मोबाईल वापरण्याची मर्यादा ठेवा. मोबाईलवर काम करणार्यांनी व्हॉटस्अॅप लॅपटॉपवर वापरावे. सोशल मीडिया टीव्हीवर वापरल्यास तो 6 फूट अंतरावर असतो. त्यामुळे त्रास कमी होतो. दर 20 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवा, 20 सेकंद 20 फूट लांबून बघा. मोबाईल बेडरूममध्ये चार्ज करू नका. मुलांना मैदानी खेळ, घरगुती खेळ, वाचन, संवाद यात गुंतवा.
मोबाईलचा स्क्रिनटाईम कमी करा
जंकफूड टाळा, समतोल आहार घ्या
अ जीवनसत्त्व पदार्थांचा वापर वाढवा
डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात धुवा
वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करा
मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा
डोळ्यांची कार्यक्षमता वाढवणारा आहार
चष्म्या घालवणारे ऑपरेशन 20 वयानंतर
दररोज दहा वेळा डोळ्यांचा व्यायाम करा
नंबर वाढल्यास नियमित तपासणी करा
निराधार, बेघरांसाठी मोफत शस्त्रक्रिया केल्या. त्यावेळी त्यांना आपल्याविषयी ‘म्हंबईचे डॉक्टर’ एवढेच माहीत असायचे. शस्त्रक्रियेनंतर त्यांना स्पष्ट दिसू लागल्यावर मला भेटून, माझ्या गालावरून हात फिरवायचे. कष्टामुळे, वार्धक्यामुळे त्यांच्या सुरकुतलेले, खरबडीत हाताने गालावर कधी ओरखडेही यायचे; पण ते ओरखडे नव्हे, तर त्यांनी मला दिलेला तो आशीर्वाद होता, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.
व्याख्यानासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच कोल्हापूरकरांनी उपस्थिती लावली होती. व्याख्यानापूर्वीच मुख्य सभागृह गर्दीने खचाखच भरले. यानंतर सभागृहाबाहेर लावलेल्या स्क्रीनसमोरील खुर्च्याही पूर्ण भरल्या. पाऊस सुरू असूनही सभागृहाबाहेर लोक छत्री घेऊन ऐकत होते.
मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया कॅम्पच्या माध्यमातून अनेक कुष्ठरोग्यांचे ऑपरेशन करण्याचा संकल्प केला होता. त्यातून हजारो कुष्ठरोग्यांना नवी द़ृष्टी देण्याचे भाग्य मिळाले. त्यांना नवी द़ृष्टी मिळते तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील आनंद खूप बोलका होता, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.
डॉ. लहाने यांनी आपल्या आयुष्यातील भावनिक क्षण सांगताना कुटुंबातील 19 लोकांनी मला किडनी देण्याची तयारी दर्शवली होती; पण आईची किडनी मॅच झाली. आईला अनेक टाके पडले; पण त्याआधी डॉक्टरांनी तिला सांगितलं की, तुझी एक किडनी काढायची आहे, तेव्हा ती म्हणाली, माझी एक किडनी चालत नसेल, तर दुसरीही घ्या; पण माझा तात्या वाचला पाहिजे. आईच्या पोटातून 39 व्या वर्षी मला पुनर्जन्म मिळाला आणि त्याच क्षणी मी ठरवलं की, या पुढच्या आयुष्यात समाजासाठी मोठे चांगले काम करायचे, त्या कामाविषयी आईला ऐकायला मिळेल, तिच्या चेहर्यावर तो अभिमान दिसला पाहिजे. या भावनेतून आज तुम्हा सगळ्यांसमोर उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
एकदा मोफत शस्त्रक्रियेचा कॅम्प सुरू होता, तेव्हा काही कामानिमित्ताने आलेल्या गानसम—ाज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पला भेट दिली. त्यावेळी रुग्णांची रांग पाहून लतादीदी भारावल्या आणि त्यांनी त्यांच्या खासदारकीचे मिळालेले पावणेदोन कोटी रुपयांचे मानधन कॅम्पसाठी दिले, असेही त्यांनी सांगितले.