कोल्हापूर : गेल्या 21 वर्षांपासून कोल्हापूरमध्ये आरोग्यविषयक प्रबोधनाची अखंड तेवणार्या ज्ञानज्योत ‘डॉक्टर्स डे विशेष व्याख्यानमाले’ने यंदा 22 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. दै. ‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानमालेचे पुष्प आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्ररोगतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे ‘डोळे आणि आरोग्य’ या विषयावर गुंफणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूरकरांना डोळ्यांच्या आरोग्याविषयी नवी द़ृष्टी मिळणार आहे. मंगळवारी (दि. 1) सायंकाळी सव्वापाच वाजता शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे कोल्हापूरकरांमध्ये यंदाही व्याख्यानमालेविषयी उत्सुकता आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्या नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डॉ. लहाने यांचे नाव जाहीर झाल्याने ही प्रतीक्षा संपली आहे. गेली दोन दशके डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते द़ृढ करणारी ही व्याख्यानमाला कोल्हापूरकरांसाठी आरोग्य संजीवनी ठरली आहे. यंदाही याचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज आहेत.
आजच्या धावपळीच्या युगात बदलती जीवनशैली, वाढलेला स्क्रीन टाईम आणि ताणतणावांमुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब यांचा डोळ्यांवर होणारा परिणाम, यामुळे डोळ्यांचे आरोग्य टिकवणे जिकिरीचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. लहाने यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरणार आहे. डोळ्यांचे आजार, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि आधुनिक उपचार पद्धती यावर ते प्रकाश टाकतील. डोळ्यांचे सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठीची मौलिक माहितीही या व्याख्यानात मिळेल. डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी काय करावे आणि कोणते खासगी उपाय करू नयेत, याची माहितीही ते देतील.
लातूर जिल्ह्यातील माकेगाव या छोट्याशा गावातून येऊन लाखो रुग्णांच्या जीवनात प्रकाश पेरणार्या डॉ. तात्याराव लहाने यांनी नेत्रतपासणी शिबिरांची एक चळवळच महाराष्ट्रात उभी केली. त्यांच्या या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ किताबानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे कार्य आणि अनुभव ऐकण्याची संधी कोल्हापूरकरांना यानिमित्ताने मिळणार आहे.
डॉ. लहाने यांच्या जीवन चरित्रावर ‘डॉ. तात्या लहाने अंगार पॉवर इज विदीन’ हा चित्रपट तयार करण्यात आला असून, तो प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. त्यांना त्यांच्या आईने किडनी देऊन जीवनदान दिले आहे.
प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग (पुणे), योगी डॉ. समप्रसाद विनोद, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, अस्थिरोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. सलीम लाड, मधुमेहतज्ज्ञ डॉ. बोरासकर, डॉ. आसगावकर, मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, स्पाईनतज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज, डॉ. सतीश गुप्ता, डॉ. मोहित गुप्ता, डॉ. अविनाश सुपे, डॉ. संजय ओक, डॉ. कल्याण गंगवाल, आहारतज्ज्ञ डॉ. रुजुता दिवेकर, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, डॉ. मिलिंद मोडक, डॉ. रत्नपारखी, डॉ. प्रेमानंद रमाणी.
प्रवेश अग्रक्रमानुसार देण्यात येणार असून, पहिल्या तीन रांगा राखीव आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.