कोल्हापूर

Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिता जाधव यांचा विजय पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठी ताकद ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Graduate Constituency Election : पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पूर्ण करू; महायुतीचा पदवीधर मेळाव्यात निर्धार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या सक्षम उमेदवार आहेत. त्यांचे व्हिजन, त्यांनी पदवीधरांसाठी तयार केलेला कार्यक्रम, त्यांची पुढची दिशा आणि आजवरचा अनुभव पाहता, त्यांचा विजय हा पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठी भर ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. धैर्यप्रसाद हॉल येथे पदवीधर व शिक्षक मतदार मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ही निवडणूक केवळ सरकारसाठी नाही, तर तुमच्या हक्काचा प्रतिनिधी सभागृहात पाठवण्यासाठी आहे. त्यामुळे पदवीधरांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा आणि कोल्हापुरातीलच स्थानिक उमेदवार महायुतीने दिला आहे. त्यांच्या विजयासाठी आवश्यक असणारा कोटा पूर्ण करून त्यांना पहिल्याच फेरीत निवडून आणूया.”

डॉ. जाधव यांच्या पाठीशी महायुती एकसंधपणे मैदानात उतरली असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, “कोल्हापूर ही विक्रमांची भूमी आहे. पदवीधर मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार म्हणून कोल्हापूरकरांना नवा विक्रम नोंदवण्याची संधी आहे. यासाठी कोल्हापूरकर स्मिता जाधव यांना नक्कीच आशीर्वाद देतील आणि त्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहील.”

महायुतीचे सरकार राज्याला सातत्याने पुढे नेण्याचे काम करत असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, “पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रात सरकारने लक्षणीय कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची वीज बिले माफ केली. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे, तर औद्योगिक क्षेत्रात झालेल्या ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीतून लाखो हातांना रोजगार मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे राज्याचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत असून त्यातून अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. याशिवाय कोल्हापूरच्या पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे.”

जाधव यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू : मुश्रीफ

“पदवीधर मतदारसंघाची जागा आम्हाला मिळेल असे वाटत होते व त्यासाठी दीड वर्षांपासून प्रयत्नही सुरू होते. मात्र, गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले अरुण लाड हे भाजपमध्ये गेले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही जागा आपल्याला सुटल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील,” असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

विजयाची जबाबदारी आमची : चंद्रकांत पाटील

“डॉ. स्मिता जाधव या उच्चविद्याविभूषित असून त्यांना शिक्षण क्षेत्रातील कामाचा २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यासोबतच त्या दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सून, डॉ. डी. वाय. पाटील यांची नात, आमदार सतेज पाटील यांची भाची, डॉ. पी. डी. पाटील यांच्या कन्या आणि डॉ. योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे शैक्षणिक अनुभवासोबतच त्यांना समृद्ध सामाजिक वारसा लाभला आहे. कोल्हापुरातून त्यांना किमान ८० टक्के मतदान होईल आणि पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण करून त्या विजयी होतील, याचे चोख नियोजन करणे ही आमची जबाबदारी असेल,” असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भैय्या माने म्हणाले, “या निवडणुकीसाठी आपणही तयारी करून अर्ज भरला होता. मात्र, पक्षादेश आणि मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे यांनी केलेली विनंती तसेच ‘पुढारी’ परिवाराशी असलेले ऋणानुबंध लक्षात घेऊन मी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता नोंदणीकृत मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून ती आपण यशस्वीपणे पार पाडू.”

यावेळी मनोगत व्यक्त करताना उमेदवार डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, “पदवीधरांसाठी नऊ कलमी कार्यक्रम हाती घेतला असून तो प्रभावीपणे राबवून पदवीधर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासास मी नक्कीच पात्र ठरेन.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT