कागल : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी - महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी गुरुवारी (दि. १५) कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान कागल परिसरातील पदवीधर तरुणांचे प्रलंबित प्रश्न आणि प्रचार मोहिमेच्या प्रभावी रणनीतीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
या महत्त्वपूर्ण बैठकीप्रसंगी कागलच्या नगराध्यक्षा सविता प्रताप माने यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आणि दांडग्या जनसंपर्काचा महायुतीच्या प्रचाराला मोठा फायदा होणार असून, आगामी विजयात त्यांचे योगदान अत्यंत निर्णायक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्थानिक पदवीधर व सुशिक्षित बेरोजगारांच्या अपेक्षा, रोजगाराच्या नव्या संधी आणि तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आखायची रणनीती यावर या बैठकीत भर देण्यात आला.
माने कुटुंबीयांनी केलेल्या आदरतिथ्य आणि आपुलकीच्या स्वागताबद्दल डॉ. स्मिता जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘प्रताप भैय्या यांचा प्रदीर्घ अनुभव आणि कागल परिसरातील त्यांचे मजबूत जनसंपर्काचे जाळे महायुतीच्या विजयात नक्कीच मोलाची भूमिका बजावेल,’ असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
या सदिच्छा भेटीमुळे कागल परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, महायुतीच्या प्रचार मोहिमेला यामुळे नवी गती मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.