‘‘डॉ. डी. वाय पाटील...सारे जग त्यांना शिक्षणमहर्षी, शिक्षणतज्ज्ञ आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील म्हणून ओळखते; पण माझ्यासाठी मात्र ते माझ्यात आत्मविश्वास निर्माण करणारे, कधी पाठीवर थाप तर कधी डोक्यावर हात ठेवणारे माझे बापमाणूस होते. प्रचंड आशावादी, सकारात्मक आणि दूरदृष्टीचा झरा असलेले माझे दादा आज वयाच्या ९१ व्या वर्षी शरीराने निघून गेले असले तरी संस्कार, प्रेम, धैर्य, माणुसकी आणि कर्तृत्वातून माझ्या हृदयात कायम कोरलेले राहतील. डी. वाय. दादा नावाच्या विद्यापीठाचा मी शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच राहीन.’’ या भावना आहेत डॉ. संजय डी. पाटील यांच्या.
मंगळवारी सकाळी डी. वाय. पाटील यांनी कायमचे डोळे मिटले आणि संजय पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला. ‘माझे वडील, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आजही आमच्यासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत,’ असे सांगताना त्यांच्या प्रत्येक शब्दातून कृतज्ञतेचा स्वर उमटत होता. संजय पाटील यांनी सांगितले की, दादांनी आम्हा भावंडांना संपत्तीपेक्षा संस्कारांची श्रीमंती दिली. प्रत्येक माणसाचा सन्मान करा, शब्द दिला की तो पाळा, कामात प्रामाणिकपणा ठेवा, संकटांना घाबरू नका आणि शिक्षणातून समाजसेवा करा, हा त्यांचा कानमंत्र आयुष्याचा मार्गदर्शक ठरला. अडचणी म्हणजे थांबण्याचं कारण नाही, त्या पुढे जाण्याची संधी असते, हा विश्वास दिला. त्यामुळे संकटांकडे कधी समस्या म्हणून नव्हे, तर नवी दिशा देणाऱ्या संधी म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली.
दादांमधील वडील नेहमी मला असे सक्षम करणारेच होते. वडील या नात्याने दादांनी मला कधी आदेश दिले नाहीत, तर त्यांनी कृतीतून शिकवले. मुलांवर कधी अधिकार गाजवला नाही, तर विश्वास टाकला. चूक झाली तर समजावले, यश मिळाले तर कौतुकाची थाप दिली. त्यामुळे आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि समाजाप्रति असलेली बांधिलकी आपोआप विकसित झाली, असे सांगताना संजय पाटील यांच्या डोळ्यात पाणी, तर चेहऱ्यावर अभिमान होता.
नम्रता अन् कृतज्ञता त्यांनीच शिकवली
दादांनी आम्हाला नम्रतेचा आणि माणुसकीचा वारसाही दिला. १९७६ मध्ये जपानहून त्यांनी मला पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘‘नेहमी सौजन्यशील रहा. नम्रता कधीही सोडू नको.’’ हा संदेश आजही माझ्यासाठी जीवनमंत्र आहे. कृतज्ञता हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. ते नेहमी म्हणायचे, ‘‘आपण इतरांसाठी केलेले उपकार वाळूत लिहा; पण इतरांनी आपल्यासाठी केलेले उपकार हृदयात कोरून ठेवा.’’ हा विचार त्यांनी केवळ सांगितला नाही, तर आयुष्यभर जगून दाखवला. तेच बीज बाप म्हणून त्यांनी माझ्यात पेरले.
नव्वदीपार ते रुबाबातच जगले
दादांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार आणि प्रसन्न होते. अगदी नव्वदीपारही ते रुबाबातच जगले. त्यांचा हा दृष्टिकोन मला खूप सकारात्मक वाटायचा. आवडत्या पोशाखावर जाकीट, हातातील अंगठ्या आणि नेटक्या राहणीमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दिवसाची सुरुवातही ते व्यवस्थित आवरून आणि उत्साहाने करायचे. चेहऱ्यावरील तेज, हसतमुख स्वभाव आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे प्रत्येकाशी संवाद साधताना ते सहज आपलेसे वाटायचे.
दादांचा विश्वास हाच मोठा पुरस्कार
१९८८ मध्ये मी तळसंदे येथे १४८ शेतकऱ्यांकडून २०५ एकर जमीन खरेदीचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण केला. त्या वेळी सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी माझ्या कामाचे कौतुक करत, ‘‘मोठी जबाबदारी पार पाडण्याची क्षमता संजयमध्ये आहे,’’ असे जाहीरपणे सांगितले. वडिलांनी व्यक्त केलेला तो विश्वास माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा होता. शिस्तीबाबतही ते तितकेच कठोर होते. त्या शिस्तीनेच आमच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.
दातृत्व, माणुसकीचा वारसा जपणार
गरजू, वंचित आणि अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करणे हा दादांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग मी लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यांच्या दारातून कोणताही गरजू माणूस रिकाम्या हाताने परत गेला नाही. आर्थिक मदतीबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना व गरजू कुटुंबांना आधार दिला. समोरच्या व्यक्तीच्या गरजा ओळखून मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची वृत्तीच त्यांच्या माणुसकीचे खरे दर्शन घडवत होती. त्यांचा मुलगा म्हणून हा वारसा मी जपणार आहे.