डॉ. राजेंद्र भारूड 
कोल्हापूर

Kolhapur News| वीस रुपयांनी घडवला ‌‘आयएएस‌’चा प्रवास

नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी उलगडला प्रवास

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः आर्थिक परिस्थिती कधी कधी आयुष्याची दिशा बदलते, हे वाक्य कोल्हापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या जीवन प्रवासातून अक्षरशः खरे ठरते. एम. बी. बी. एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर शिक्षणाची स्वप्ने त्यांनी पाहिली होती; मात्र पी. जी. प्रवेशासाठी लागणारे महागडे फॉर्म, पुस्तकांचा खर्च व कोचिंग क्लासेस यामुळे ते स्वप्न अपूर्णच राहिले. अशावेळी नियतीने वेगळीच वाट त्यांच्यासमोर उभा केली अन्‌‍ वीस रुपयांनी घडवला ‌‘आयएएस‌’चा प्रवास!

डॉ. भारूड यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. भारूड हे आदिवासी समाजातील पहिले आयएएस आहेत. ते म्हणाले, आमच्या घरी कुणीही शिकलेले नव्हते; परंतु माझ्या आईची खूप इच्छा होती की, आम्ही भावडांनी शिक्षण घ्यावे. त्यानुसार आईने शाळेत घातले. दहावी, बारावीला चांगले मार्क मिळाले. त्यानंतर एम. बी. बी. एस. शिक्षण केले. त्यानंतर पुढे वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते.

यूपीएससी हा माझा मूळ उद्देश नव्हता; पण त्या वेळी फॉर्म अवघ्या वीस रुपयांना मिळत होता. एका मित्राने दोन फॉर्म आणले. त्यातील एक मी भरला आणि आयुष्याची दिशा बदलली. आर्थिक अडचणीमुळे घेतलेला हा निर्णय जिद्द आणि अथक परिश्रमांमुळे यशस्वी ठरला. दिवस-रात्र अभ्यास करत स्पर्धा परीक्षा पार केली आणि अखेर आयएएस पद मिळविले, असे डॉ. भारूड यांनी सांगितले. सोलापूर जि.प.त अडीच वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केल्याचे सांगून डॉ. भारूड म्हणाले, कोल्हापूर माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वीही अंबाबाईच्या दर्शनासाठी येऊन गेलो आहे. तसेच शिवाजी विद्यापीठात वेगवेगळ्या कामानिमित्त येत होतो. महाराष्ट्राशी माझी नाळ घट्ट जोडलेली आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द आणि मेहनत असेल, तर यश नक्की मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT