कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठास तब्बल आठ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर डॉ. आर. के. कामत यांच्या रूपाने नवीन कुलगुरू मिळाले आहेत. डॉ. कामत यांचा विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक ते कुलगुरू असा थक्क करणारा प्रवास राहिला आहे. डॉ. डी. टी. शिर्के यांच्यानंतर सलग दुसर्यांदा कोल्हापूरच्या सुपुत्रास कुलगुरुपदाची संधी मिळाली आहे.
डॉ. कामत यांचे मूळ गाव कागल असून, त्यांचा जन्म मिरज (जि. सांगली) येथे झाला. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. गोवा विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. त्यांच्याकडे 28 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, यंत्रशिक्षण व सायबर-भौतिक प्रणाली क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केले आहे. त्यांनी 23 हून अधिक अभ्यासक्रम विकसित केले आहेत. त्यांच्या नावावर अनेक पेटंट, आंतरराष्ट्रीय पुस्तके व संशोधन प्रकल्प आहेत. डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून कार्यरत होते. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे.
कोल्हापूरच्या सामाजिक-शैक्षणिक परंपरेशी निगडीत
डॉ. कामत यांचे कुटुंब करवीर संस्थान व कोल्हापूरच्या सामाजिक-शैक्षणिक परंपरेशी निगडीत आहे. त्यांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराजांचे खासगी वैद्य होते. त्यांचे काका डॉ. बाळकृष्ण कामत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्नेही होते. डॉ. आंबेडकर यांनी कागल येथे त्यांच्या घरी मुक्काम केला होता. त्यांचे वडील कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागात उपअधीक्षक पदावर कार्यरत होते.