कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला निश्चित होणार. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिली. बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकार्यांसह शिष्टमंडळाने डॉ. जाधव यांची भेट घेतली. खंडपीठाच्या लढ्यात आपण आग्रही आहात. खंडपीठासाठी आपले योगदान मोठे आहे. खंडपीठाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. तो मार्गी लागावा, यासाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने डॉ. जाधव यांना केली.
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, खंडपीठाच्या स्थापनेसाठी गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यात दै. ‘पुढारी’ अग्रभागी आहे. या लढ्यात आपले योगदान मोलाचे ठरले आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ठरलेल्या कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेसाठी दै. ‘पुढारी’च्या पुढाकारानेच हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील म्हणाले, खंडपीठाच्या लढ्यात दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार व सामाजिक संघटनांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांच्यामुळेच या प्रश्नाला चालना मिळाली आहे. योगायोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई पदभार घेत आहेत. त्यामुळे डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. डॉ. जाधव यांनी पुढाकार घ्यावा आणि याप्रश्नी मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. संपतराव पवार, अॅड. धनंजय पठाडे, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. अजितराव मोहिते यांनीही चर्चेत भाग घेतला.
डॉ. जाधव म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, याकरिता प्रथम 1974 मध्ये शाहू जन्मशताब्दी कार्यक्रमात आपण तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. यानंतर तत्कालीन कायदेमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर आणि तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडेही खंडपीठाची मागणी केली होती. तेव्हापासून खंडपीठासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आपण वकील या नात्यानेही खंडपीठाच्या या लढ्यात आग्रही आहे.
डॉ. जाधव म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत खंडपीठाबाबत अनेकवेळा चर्चा झाली आहे. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या समवेत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीस यांनी खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील 20 एकर जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच आवश्यक पायाभूत सुविधांसाठी शंभर कोटी ठोक निधीची तरतूद केली होती. यावेळी डॉ. जाधव यांनी तत्काळ अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना बोलावून घेतले. खंडपीठासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. या जागेबाबत राज्य शासनाकडून आदेश आले नसले, तरी ही जागा खंडपीठासाठी राखीव ठेवण्याबाबतची नोंद इतर हक्कात करू, असे शिंदे यांनी डॉ. जाधव यांना सांगितले.
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले न्यायमूर्ती भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होत आहेत. ते स्वत: खंडपीठासाठी सकारात्मक आहेत. अनेकदा त्यांनी तशी भूमिकाही जाहीरपणे स्पष्ट केली आहे, असे सांगत डॉ. जाधव यांनी शिष्टमंडळाने दिल्लीला जाऊन त्यांचे अभिनंदन करावे आणि त्यासोबतच त्यांच्याकडे कोल्हापूर खंडपीठाची मागणी करावी. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण द्यावे, अशी सूचनाही शिष्टमंडळाला केली.
आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खंडपीठाबाबत चर्चा करू, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, यानंतर मुख्यमंत्री मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी चर्चा करतील. यामुळे कोल्हापूर खंडपीठ स्थापनेचा अंतिम टप्प्यात आलेला हा प्रश्न सुटेल आणि कोल्हापूरला खंडपीठ होईल, असा विश्वासही डॉ. जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. तुकाराम पाडेकर, सेक्रेटरी मनोज पाटील, जाईंट सेक्रेटरी सूरज भोसले, लोकल ऑडिटर प्रमोद दाभाडे, कार्यकारिणी सदस्य स्वप्निल कराळे, हंसिका जाधव, संम—ाज्ञी शेळके, स्नेहल गुरव, निखिल मुदगल, मीना पाटोळे, वैष्णवी कुलकर्णी, सिटी क्रिमिनल बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्ताजी कवाळे, रावसाहेब पाटील (हालसवडेकर), सौरभ सरनाईक, संकेत सावर्डेकर, स्वप्निल कांबळे, राजू ओतारी, तृप्ती पाडेकर, अॅड. धनश्री चव्हाण आदी उपस्थित होते.