कोल्हापूर : कोल्हापूर ही क्रीडानगरी आहे. या मातीने अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण केले आहेत. कोल्हापूरला क्रीडा क्षेत्राचा समृद्ध वारसा आहे. मात्र, त्या तुलनेत खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत. एकाच ठिकाणी सर्व सुविधायुक्त असणार्या जिल्हा क्रीडा संकुल उभारणीसाठी तसेच अनेक वर्षे रखडलेले विभागीय क्रीडा संकुल मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दिली. क्रीडा प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने बुधवारी डॉ. जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. जाधव यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी जिल्ह्यातील क्रीडाविषयक सद्यस्थितीची माहिती दिली. गेल्या 11 वर्षांपासून विभागीय क्रीडा संकुलाचे काम रखडलेले आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागा मिळत नसल्याचे सांगितले. खेळाडूंना एकाच ठिकाणी प्रशिक्षण, फिटनेस, आरोग्य केंद्र आदी सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. फुटबॉल प्रशिक्षक अमर सासने यांनी विभागीय क्रीडा संकुलांची अवस्था दयनीय झाल्याचे सांगितले. जलतरण संघटनेचे आनंद माने यांनी दर्जेदार खेळाडूंच्या निर्मितीसाठी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, त्याची माहिती दिली. अॅथलेटिक्स प्रशिक्षक अमोल आळवेकर यांनी खेळाडूंना सरावासाठी विभागीय संकुल लवकर उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ. जाधव म्हणाले, विभागीय आणि जिल्हा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीनियुक्तच साकारले पाहिजे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी अद्याप जागा निश्चित झालेली नाही. प्रारंभी जिल्हा क्रीडा संकुलासाठी आवश्यक जागा निश्चित करून ती जिल्हा प्रशासनाकडून आरक्षित करून घ्यावी लागेल. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना झाल्यानंतर त्याचे रूपांतर पूर्ण वेळ खंडपीठात होण्याकरिता आवश्यक असलेली शेंडा पार्क येथील जमीन आरक्षित करून घेतली. त्यानुसार सात-बारा उतार्यावर त्या जागेची नोंदही करून घेतली. त्याच पद्धतीने शेडा पार्क येथे जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागा राखीव करून ठेवावी लागेल. यानंतर या संकुलाच्या आराखड्याला मान्यता देऊन निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. विभागीय क्रीडा संकुलांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठीही राज्य शासनाकडे आग्रही राहू, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत बॅडमिंटन संघटनेचे उद्योगपती सतीश घाटगे, खो-खो संघटनेचे राजन उरूणकर, बुद्धिबळ संघटनेचे भरत चौगुले, बास्केटबॉल संघटनेचे डॉ. राजेंद्र रायकर, जिमनॅस्टिक संघटनेचे संजय तोरस्कर, टेबल टेनिस संघटनेचे दिग्विजय माळगे आदींनी सहभाग घेतला.
निधीची कमतरता पडू देणार नाही
कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा मोठा इतिहास आहे. यामुळे जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुल मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील राहूच; पण त्याबरोबर हे संकुल पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील, यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करून आणू. जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलाला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही डॉ. जाधव यांनी यावेळी दिली.