कुरुंदवाड : 2028 साली होणार्या कन्यागत महापर्वकाळाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून मोठा निधी मिळवून देऊ. भाविकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सुसज्ज आराखडा तयार करून सादर करावा, संबंधित मंत्र्यांची लवकरच बैठक घेऊन विकासकामांना गती देण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दिले. नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे डॉ. जाधव यांनी भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या बैठकीत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. देवस्थान समितीचे अध्यक्ष वैभव विजय काळू-पुजारी यांनी विकासकामांशी संबंधित विविध प्रस्ताव सादर केले. माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, सागर धनवडे, सरपंच चित्रा सुतार, यांनी नगरखाना विकास, मराठा समाज भवन व अन्य महत्त्वपूर्ण कामांबाबतचे प्रस्ताव सादर केले. यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, नृसिंहवाडी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, 2028 साली कन्यागत महापर्वकाळ मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. भाविकांच्या सोयीच्या द़ृष्टीने देवस्थानच्या सव्वाशे खोल्यांच्या यात्री निवासाचा प्रस्ताव अत्यंत चांगला असून, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी तत्काळ बैठक घेऊन प्रशासकीय मान्यता मिळवून देऊ. नगार खाना ही नृसिंहवाडीची एक ऐतिहासिक ओळख आहे. समाजाच्या विकासाच्या द़ृष्टीने समाज भवन उभारणीसाठीही सहकार्य करू. डॉ. जाधव यांनी दत्त साखर कारखान्याला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीचा आढावा घेतला. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी नृसिंहवाडी देवस्थान समितीचे संजय पुजारी, संतोष खोंबारे, विनोद पुजारी, सरपंच चित्रा सुतार, उपसरपंच रमेश मोरे, अवधूत पुजारी, आय. आय. पटेल, शेखर पाटील आदी उपस्थित होते.