स्वप्निल कुसाळे  Pudhari File Photo
कोल्हापूर

स्वप्निलने कोल्हापूरसह देशाचे नाव उंचावले : डॉ. प्रतापसिंह जाधव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राधानगरीतल्या छोट्या कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळे याने मिळवलेले हे यश गौरवास्पद आहे. स्वप्निलने आम्हा कोल्हापूर आणि देशवासीयांचे नाव उंचावले, असे गौरवोद्गार दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी काढले. राज्य शासनानेही वर्ग एकच्या दर्जाची नोकरी देऊन, त्याचा गौरव करावा, अशी अपेक्षाही डॉ. जाधव यांनी व्यक्त केली.

स्वप्निलने ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातल्यानंतर डॉ. जाधव यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला शिकारीचा, नेमबाजीचा वारसा आहे. मागील अनेक वर्षांचा क्रीडा क्षेत्रातील दुष्काळ स्वप्निल कुसाळेच्या रूपाने मिटलेला आहे. डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर जसे उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक वगैरे चांगल्या पदांवरील नोकरी दिली जाते. तशाच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने आता स्वप्निलला चांगल्या वर्ग एकच्या पदाची सरकारी नोकरी द्यावी, जेणेकडून अनेक खेळाडूंना याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

स्वप्निलने ऑलिम्पिक पदक मिळवल्यामुळे कोल्हापुरातल्या क्रीडा संकुलचा प्रश्नसुद्धा समोर आला आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापूरला समृद्ध क्रीडा वारसा आहे. अनेक खेळाडू या मातीने देशाला दिले आहेत. मात्र, कोल्हापूरच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. राज्य शासनाने क्रीडा संकुलाचाही प्रश्न सोडवावा, असेही त्यांनी सांगितले.

दै. ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाकडून एक लाखाचे पारितोषिक जाहीर

पुणे : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील स्वप्निल कुसाळे याने कांस्यपदक पटकावत इतिहास रचला. या निमित्ताने दै. ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने चेअरमन, समूह मुख्य संपादक आणि राष्ट्रीय नेमबाज पदक विजेते डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी रोख 1 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळाले आहे. खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्निल कुसाळेने ही कामगिरी केली आहे. याबाबत बोलताना दै. ‘पुढारी’चे समूह मुख्य संपादक डॉ. योगेश जाधव म्हणाले, देशात ऑलिम्पिकचे पहिले पदक कोल्हापूरचे खाशाबा जाधव यांनी आणले. आता स्वप्निल याने ऑलिम्पिकच्या नेमबाजीमध्ये कांस्यपदक मिळवून कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. कोल्हापूरला नेमबाजीची मोठी परंपरा आहे. नेमबाजीची सुरुवात जयसिंगराव कुसाळे यांनी प्रथम केली. रमेश कुसाळे यांनी त्याला अत्याधुनिकतेची जोड दिली. रमेश कुसाळे हे माझे प्रशिक्षक होते. त्यांनीच मला नेमबाजीचे धडे दिल्याने मी राष्ट्रीय पातळीवर पदक मिळवू शकलो. मी नेमबाजपटू आणि दै. ‘पुढारी’चा समूह संपादक म्हणून कोल्हापूरच्या स्वप्निलचे अभिनंदन करत असून त्याला 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT