कोल्हापूर : केंद्रात आणि राज्यातही भाजप महायुतीचे सरकार आहे. आता कोल्हापूर महापालिकेतही भाजपची सत्ता आली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचे सरकार असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. कोल्हापूरच्या विकासाचा रोडमॅप तयार करा. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवून शहरवासीयांना चांगल्या सुविधा द्या, अशी सूचना दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नूतन महापौर रूपाराणी निकम व उपमहापौर अक्षय जरग यांना केली.
नूतन महापौर निकम व उपमहापौर जरग यांनी शनिवारी (दि. 7) ‘पुढारी भवन’ येथे सदिच्छा भेट देऊन डॉ. प्रतापसिंह यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीत शहरातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील अकोला, नागपूरसह इतर शहरांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यात आले आहेत. तसेच सिमेंट काँक्रीटचे रस्ते कोल्हापुरात करावेत. पहिल्या टप्प्यात संपूर्ण कोल्हापुरात रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी सूचनाही डॉ. जाधव यांनी केली. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम प्रमुख उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापूर शहर झपाट्याने वाढत असून पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात नियोजनबद्ध काम करण्याची गरज आहे. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे काम करावे. स्मार्ट सिटी संकल्पना, वाहतूक कोंडी कमी करणे, स्वच्छता अभियान अधिक प्रभावी करणे तसेच शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे यावर विशेष भर द्यावा.
डॉ. जाधव यांनी यावेळी महापौर निकम व उपमहापौर जरग यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर शहराचा विकास हा दीर्घकालीन नियोजन आणि पारदर्शक प्रशासनावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरून काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सकारात्मक संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर निकम आणि उपमहापौर जरग यांनी डॉ. जाधव यांचे आशीर्वाद घेतले. शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुढील काळात नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे संयुक्त प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
भेटीदरम्यान महापौर निकम व उपमहापौर जरग यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती डॉ. प्रतापसिंह जाधव यांना केली. शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक आदीसह सर्वांगीण विकासात दै. ‘पुढारी’ आणि डॉ. जाधव यांनी कायम सकारात्मक भूमिका बजावली असून पुढील काळातही सहकार्य करावे, अशी विनंती नूतन महापौर निकम व उपमहापौर जरग यांनी केली.