Dr. Jaysingrao Pawar | डॉ. जयसिंगराव पवार इतिहासाच्या पडद्याआड; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार 
कोल्हापूर

Dr. Jaysingrao Pawar | डॉ. जयसिंगराव पवार इतिहासाच्या पडद्याआड; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुरोगामी विचारवंत, मराठेशाहीचे भाष्यकार डॉ. जयसिंगराव पवार (वय 85) यांचे कोल्हापुरात निधन झाले. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने गेले दीड महिने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी वसुधा, मुलगा पृथ्वीराज, मुली प्रा. डॉ. मंजुश्री पवार व प्रा. डॉ. अरुंधती पवार आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. तत्त्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गुरुवारी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. पवार यांचे निधन झाल्याचे समजताच लोकांनी सानेगुरुजी वसाहत येथील ‘शिवतेज’ निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास अंत्ययात्रा फुलांनी सजलेल्या स्वर्गरथ वाहनातून काढण्यात आली. ‘अमर रहे, अमर रहे इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अमर रहे...’, ‘मराठा, शाहू व ताराराणी इतिहासकार डॉ. पवार अमर रहे...’ यासह शिवछत्रपती, राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा जयघोष करत फुलांनी सजवलेल्या स्वर्गरथातून डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. मार्गावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. कोल्हापूर पोलिस दलाच्या बँड पथकाने सलामीची धून वाजवल्यानंतर पोलिसांच्या तुकडीने शिस्तबद्ध संचलन करत आकाशात तीन बुलेट फायर करत मानवंदना दिली. यानंतर खासदार शाहू महाराज, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, आ. जयंत आसगावकर, मनपाचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक आदिल फरास, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, डीवायएसपी प्रिया पाटील यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. पुरोगामी विचारांचा वारसा जपत कोणतेही विधी न करता रक्षा शेतात विसर्जित करण्यात येणार असल्याचे पवार कुटुंबीयांनी यावेळी जाहीर केले.

विविध संस्थांच्या माध्यमातून सक्रिय

1992 मध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचे ते संचालक होते. महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास आदी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त प्रकाशित होत असलेल्या ‘समग्र कोल्हापूर’ या ग्रंथाच्या संपादन मंडळाचे डॉ. पवार हे प्रमुख होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT