Rajarshi Shahu Award | डॉ. जयसिंगराव पवार यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर 
कोल्हापूर

Rajarshi Shahu Award | डॉ. जयसिंगराव पवार यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

४० वर्षांत प्रथमच मरणोत्तर पुरस्कार : जिल्हाधिकारी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक, दिवंगत डॉ. जयसिंगराव पवार यांना जाहीर झाला. ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. गेल्या ४० वर्षांत प्रथमच एखाद्या व्यक्तीला मरणोपरांत पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राजर्षी शाहूंच्या १५२ व्या जयंतीदिनी, २६ जून रोजी खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा अशा क्षेत्रांतून राजर्षी शाहूंच्या विचारांचा प्रचार, प्रसाराचे काम करणाऱ्यांना या पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राजर्षी शाहूंच्‍या विचारांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जागर करण्याचे काम डॉ. पवार यांनी हयातभर केले. त्यांनी संपादित केलेल्या १,२५० पानांचा ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ हा इतिहास संशोधनातील मैलाचा दगड मानला जातो. मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर सखोल प्रकाश टाकताना त्यांनी महाराणी ताराबाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, मराठेशाहीचा मागोवा अशा ४० पेक्षा जास्त इतिहासविषयक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम, सेनापती संताजी घोरपडे या प्रसिद्ध साहित्यकृतींना सर्वोत्कृष्ट इतिहास ग्रंथ-राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. यासह त्यांना ३५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. दि. २६ मार्च रोजी त्यांचे निधन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT