कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यावर मात करून सावरलेले डॉ. डी. वाय. पाटील यांना दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागले. घरातच उपचारांची आणि आवश्यक वैद्यकीय देखभालीची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. प्रकृती खालावत असल्याची जाणीव कुटुंबीयांना होती; पण मन मात्र अजूनही एखाद्या चमत्काराचीच वाट पाहत होते. वेळ जसजशी पुढे सरकत गेली, तसतशा डी. वाय. पाटील यांच्या शारीरिक हालचाली मंदावत गेल्या. डोळे हळूहळू मिटत चालले होते... हातातील हात सुटत चालले होते आणि घरातील प्रत्येकाच्या मनात एकच भावना दाटून येत होती... दादा आता आपल्याला सोडून जाणार. त्या खोलीत शब्द फारसे नव्हते; पण डोळे भरून आले होते.
आयुष्यभर हजारो लोकांना आधार देणारा, अनेकांचे भविष्य घडवणारा आणि स्वतःचे कुटुंब प्रेमाने एकत्र ठेवणारा माणूस अखेरच्या प्रवासाला निघाल्याची जाणीव प्रत्येकाला अस्वस्थ करत होती. अखेर मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा श्वास थांबला. तो क्षण पाटील कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता.
आयुष्यभर इतरांच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश पेटवणारे दादा त्या क्षणी मात्र शांत होत चालले होते. डोळे कायमचे मिटण्याआधी त्यांनी आपल्या कुटुंबाला शेवटचा स्पर्श दिला आणि त्या स्पर्शातच आयुष्यभर जपलेले प्रेम, संस्कार आणि मायेचा ठेवा सोपवून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्या क्षणाने पाटील कुटुंबासाठी केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा आधारवड हरपल्याची वेदना कायमची मनात कोरली.
अगदी दहा दिवसांपूर्वीपर्यंत दोन दिवसांतून एकदा तळसंदेला फेरफटका मारण्याचा त्यांचा शिरस्ता त्यांनी कायम ठेवला होता. आषाढी एकादशीच्या दिवशीही ते तळसंदेला गेले होते. परत आल्यानंतर कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत वेळ घालवला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची स्मरणशक्ती काहीशी कमी झाली होती, तरीही आजूबाजूला कोण आहे, कोण आले आहे, याची ते विचारपूस करत होते. सोमवारी सकाळपासून मात्र घरातील वातावरण बदलून गेलं होतं. कुटुंबातील प्रत्येकजण मनाला आवरत, स्वतःला सावरत त्यांच्या उशाशी बसून होता. मनात आठवणींचा महापूर उसळला होता. अखेर डोळे कायमचे मिटले... शरीर शांत झाले... आणि प्रेम, संस्कार, माणुसकीचा अमूल्य ठेवा आपल्या कुटुंबाच्या हाती सोपवत डॉ. डी. वाय. पाटील अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
...अन् तो स्पर्श कायमचा मनात साठवला
पलंगाभोवती संपूर्ण कुटुंब जमा झाले होते. पत्नी शांतादेवी पाटील त्यांच्या शेजारी शांतपणे बसल्या होत्या. संजय पाटील आणि सतेज पाटील वडिलांचा हात हातात घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. मुली, सून, नातवंडेही त्यांच्या आजूबाजूला होती. कोणी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होते, कोणी पाय चोळत होते, तर कोणी त्यांच्या हातावर आपला हात ठेवून तो स्पर्श कायमचा मनात साठवून घेत होते.