कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, सहकार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात मोठे कार्य उभे केले. त्यातून त्यांनी सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. धनंजय महाडिक, आ. अशोकराव माने, राहुल आवाडे, शिवाजी पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यपाल म्हणून डॉ. डी. वाय. पाटील यांनी तीन राज्यांची जबाबदारी पार पाडली. त्यापूर्वी आमदार तसेच अन्य पदांवर काम करताना प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवला. ते केवळ नेते नव्हते, तर ते एक विचारवंत होते.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आ. सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. फडणवीस यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पत्नी शांतादेवी यांचेही सांत्वन केले. तत्पूर्वी, सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीयांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासह विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही डॉ. पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
महाराष्ट्राकरिता मोठी हानी
एक कृतार्थ जीवन डी. वाय. दादा जगले. संपूर्ण जीवनाला समृद्ध करेल, असा विचार त्यांच्याकडे होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी, कुटुंबीयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार जपण्याचे कार्य केले आहे. त्यांच्यासारखे नेते आपल्यातून निघून जाणे ही महाराष्ट्राकरिता मोठी हानी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.