आधुनिक भारताच्या वैद्यकीय, तांत्रिक आणि उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षणमहर्षी, समाजसेवक, माजी राज्यपाल आणि दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले डॉ. डी. वाय. पाटीलसाहेब यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, समाजहितैषी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, समाजकारण, अध्यात्म आणि सार्वजनिक जीवन या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. कोल्हापूर, पुणे, नवी मुंबई आणि देशातील विविध भागांत त्यांनी आधुनिक विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन, जैवतंत्रज्ञान, नर्सिंग, फार्मसी तसेच इतर व्यावसायिक शिक्षण संस्था उभारून लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. आरोग्य सेवेतही त्यांनी अत्याधुनिक रुग्णालयांची उभारणी करून सर्वसामान्य जनतेस दर्जेदार व सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ आणि सेवाभावी दृष्टिकोन यांच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे नेरुळ, नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्याधुनिक डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमची अल्पवधीतच उभारणी केली.
डॉ. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व साधेपणा, सेवाभाव, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाने प्रेरित होते. शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, या विचारावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांच्या कार्यामुळे हजारो शिक्षक, संशोधक, डॉक्टर, अभियंते, उद्योजक आणि प्रशासकीय अधिकारी घडले असून, आज ते देश-विदेशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत आहेत.
त्यांचे संपूर्ण जीवन हे समाजहितासाठी केलेली एक अखंड तपश्चर्या होती. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक आणि आरोग्य संस्थांमधून त्यांचे विचार, मूल्ये आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. अशा या महान शिक्षणमहर्षीस, दूरदर्शी राष्ट्रनिर्मात्यास आणि युगपुरुषास भावपूर्ण श्रद्धांजली. व्यक्ती जाते; परंतु तिचे कार्य अमर राहते. डॉ. डी. वाय. पाटील साहेबांनी उभारलेली ज्ञानाची आणि सेवाभावाची परंपरा आगामी अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने आधुनिक शिक्षण निर्मितीचे आणि समाजसेवेतील एक युग संपले असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, आरोग्य आणि समाजकारणातील एक उत्तुंग व दूरदर्शी नेतृत्व आपण गमावले आहे. डॉ. डी. वाय. पाटील हे आधुनिक, उच्च शिक्षण व्यवस्थेचे आणि खासगी विद्यापीठांचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. त्यांनी उभारलेल्या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांनी लाखो तरुण आणि रुग्णांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक जबाबदारीही अत्यंत समर्थपणे पेलली. त्यांचे जीवन हे समाजहित आणि राष्ट्र उभारणीसाठी समर्पित होते. या कठीण प्रसंगी मी पाटील परिवार, त्यांचे लाखो विद्यार्थी आणि स्नेहींच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.– मा. सुरेश प्रभू माजी केंद्रीय मंत्री