कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते उचगाव आणि कागल शहरातील उड्डाणपूल, पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिज यांचे ‘डीपीआर’ तयार करण्यात आले आहेत. येत्या आठवड्यात हे ‘डीपीआर’ केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत. ते मंजूर होतील, यामुळे या कामांच्या लवकरच निविदा काढल्या जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात याप्रश्नी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. दि. 10 जून रोजी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक होणार असून, त्यानंतर या कामांना गती येणार आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते शेंद्रे या मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत सांगली फाटा ते उचगाव मार्गावर उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाचा ‘डीपीआर’, तावडे हॉटेल ते सीपीआर चौक ते शिवाजी पूल व गगनबावडा रोड या कोल्हापूर इंटरनल सिटी इलेव्हेटेड फ्लाय ओव्हरचे सादरीकरण झाले. शिवाजी पूल ते केर्लीदरम्यान रस्त्यावर दरवर्षी पुराचे पाणी येते. यामुळे या मार्गावर येणार्या पाण्याचा निचरा होणासाठी विविध उपाययोजनांसह नव्या रस्त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याचेही या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.
सातारा-कागल महामार्गावर कागल शहरात उड्डाणपूल उभारण्याची मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्यानुसार या ठिकाणी उभारण्यात येणार्या उड्डाणपुलासह सांगली फाटा ते उचगावदरम्यान भरावाऐवजी पिलर टाकून पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पुलाचा, तसेच कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी उभारण्यात येणार्या बास्केट बि—जचा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला आहे.
या ‘डीपीआर’नुसारचा निधी उपलब्धतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे येत्या 15 दिवसांत सादर केला जाईल, असे बैठकीत प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले. हे प्रस्ताव येत्या आठवड्यात केंद्र शासनाकडे सादर होतील. दि. 10 जून रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत या सर्व प्रस्तावांना मान्यता मिळेल, त्यानंतर येत्या जूनअखेर या कामांच्या निविदा काढण्याचा प्रयत्न असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.