राजेंद्र जोशी
कोल्हापूर : औषधांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाकडून (एनपीपीए) आणीबाणीच्या अधिकारांचा वारंवार वापर होत असल्याबद्दल देशातील औषध उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा हस्तक्षेपांमुळे औषध उत्पादक कंपन्यांच्या व्यावसायिक नियोजनात अनिश्चितता निर्माण झाली असून गुंतवणूक, उत्पादन क्षमता आणि औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. याविषयी देशातील औषधनिर्मात्यांच्या संघटनेने केंद्र सरकारचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे.
भारतात सर्वसामान्य रुग्णाचा औषधोपचाराअभावी मृत्यू होऊ नये, त्यांना परवडणार्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत, रुग्णाच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन औषध कंपन्यांनी नफेखोरी करू नये, याकरिता औषध किंमत नियंत्रण आदेश (डीपीसीओ), २०१३ मधील परिच्छेद १९ अंतर्गत सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अपवादात्मक परिस्थितीत सरकारला औषधांच्या किमती निश्चित करण्याचे किंवा त्यामध्ये बदल करण्याच्या अधिकाराची तरतूद केली. यामुळे बाजारात परवडणार्या दरामध्ये औषधे उपलब्धतेचा मार्गही मोकळा झाला. मात्र, ‘एनपीपीए’ या अधिकारांचा वारंवार वापर करीत असल्याची औषध कंपन्यांची तक्रार असून, त्याच्या अंमलबजावणीच्या निकषांबाबत कंपन्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
वर्षात पाच वेळा अधिकाराचा वापर
‘एनपीपीए’ने चालू वर्षात या अधिकारांचा पाच वेळा वापर केला आहे. यामध्ये १३७ कर्करोगविरोधी औषधांवर कमाल किरकोळ किमतीच्या (एमआरपी) ३० टक्क्यांपर्यंत व्यापार नफ्याची मर्यादा निश्चित करणे तसेच सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिन या कर्करोगावरील औषधांच्या कमाल किमतीत ५० टक्के कपात करण्याचा समावेश आहे. यापूर्वी २०२४ मध्ये ११ औषधांच्या किंमत कपातीसाठी या अधिकारांचा वापर झाला होता.
गुंतवणुकीवर परिणाम शक्य
अचानक २० ते ४० टक्क्यांपर्यंत किंमत कपात केल्यास कंपन्यांच्या ब्रँड उभारणीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. कच्चा माल आणि उत्पादन खर्च वाढत असताना किंमत नियंत्रणाचे निर्णय घेतल्यास उत्पादनाची आर्थिक व्यवहार्यताही धोक्यात येऊ शकते, असे मत ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स ऑफ इंडियाचे (ओपीपीआय) महासंचालक अनिल मताई यांनी व्यक्त केले आहे.