कोल्हापूर : ‘दोस्तीच्या हाकेला साद देणारं, पण नडलं तर लय बाद करणारं कोल्हापूर... जिथे जिथे भरपूर, तिथे तिथे पुरेपूर... ते माझं कोल्हापूर!’ अशा शब्दांत आपल्या कोल्हापूरप्रेमाची भावना व्यक्त करत, शहराचे बदलते रूप पाहून येथील अस्सल ‘बाज’ कमी होऊ देऊ नका, असा भावनिक सल्ला सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी दिला.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या आर्ट सर्कल आणि ट्रॅव्हल्स क्लबतर्फे आयोजित ‘वाजणार आता, गाजणार आता’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. आपले आजोळ कोल्हापूर असल्याने जन्मापासूनच येथील मातीशी घट्ट ऋणानुबंध असल्याचे गुप्ते यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्हापुरात राहिलेला प्रत्येकजण कोल्हापुरीच होतो, इतका या शहराचा लळा आहे. कामामुळे नियमित येता येत नसले तरी मन इथेच असतं. कोल्हापूर बदलत आहे. पण त्याचा मूळ बाज आणि ठसका कमी होता कामा नये, हेच गुप्ते यांना खुपते. डॉक्टर सर्वगुणसंपन्न असतात, त्यांच्यात अनेक कला वास करतात.
यावेळी गायक स्वप्निल बांदोडकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. संगीत क्षेत्रात येऊ इच्छिणार्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. शीतल पाटील आणि डॉ. आशुतोष देशपांडे यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी केले. आर्ट सर्कलचे समन्वयक डॉ. शिरीष पवार यांनी व्यक्त केले. यावेळी सचिव डॉ. अरुण धुमाळे, आर्ट सर्कलचे समन्वयक डॉ. शिरीष पवार, डॉ. अशोक भूपाळी, डॉ. एन. वाय. जोशी, डॉ. दिलीप पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. किरण दोशी, डॉ. दिपक जोशी, डॉ. राजेंद्र वायचळ डॉ. ए. बी. पाटील, डॉ. आशा जाधव, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. शीतल पाटील, डॉ. आशुतोष देशपांडे, डॉ. शिवकुमार सोलापूरकर आदी उपस्थित होते.