कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दानपेट्यांमध्ये भाविकांनी एक कोटी 85 लाख 87 हजार 900 रुपयांचे दान अर्पण केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने मंदिर आवारात ठेवण्यात आलेल्या 12 दानपेट्यांमधील देणगीची मोजदाद सोमवारी पूर्ण झाली असून 15 मे ते 15 जुलै या गेल्या दोन महिन्यांतील हे दान आहे.
16 जुलैपासून देवस्थान समितीच्या वतीने दानपेट्यांमध्ये भाविकांनी देणगी दाखल अर्पण केलेल्या रोख रकमेची मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू होती. मंदिर आवारातील अभिषेक मंडपात चार दिवस पोलिस बंदोबस्तात सोमवारी 21 रोजी रात्री आठ वाजता मोजदाद प्रक्रिया पार पडली. यासाठी देवस्थानतर्फे 33 कर्मचारी काम करत होते.
मोजदादच्या पहिल्या दिवशी दि. 16 रोजी चार दानपेट्या उघडण्यात आल्या. दुसर्या दिवशी एक नंबरची पेटी उघडण्यात आली; तर तिसर्या दिवशी 2 नंबरची दानपेटी उघडण्यात आली. या दानपेटीत सर्वाधिक 63 लाख 47 हजार 718 इतकी सर्वाधिक देणगी दान स्वरूपात आली; तर सोमवारी शेवटच्या दिवशी तीन दानपेट्यांमधील देणगीची मोजणी करण्यात आली.