पोहाळे तर्फ आळते : दोनशे वर्षांपूर्वी पोहाळे तर्फ आळते येथील जंगलात धनगरांच्या कुत्र्यांनी वाघाची शिकार केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा आशयाचे पत्र तत्कालीन जोतिबा डोंगर येथील हुजूर वाड्यातील अधिकारी बाळाजी भोसले व राघो बाळाजी यांनी वरिष्ठ हुजूर कार्यालयास लिहून पाठवले होते. हे मोडी लिपीतील पत्र कोल्हापूर येथील पुरालेखागार कार्यालयात उपलब्ध आहे.
202 वर्षांपूर्वी म्हणजे 1823 मध्ये पोहाळे तर्फ आळते येथे रात्रीच्या वेळी धनगरांच्या मेंढरांच्या कळपावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या वाघावर धनगरांच्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्या वाघाला ठार मारले. त्याची माहिती स्थानिक अधिकारी या नात्याने वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथील हुजूर वाड्यातील अधिकारी यांनी वरिष्ठांना म्हणजेच कोल्हापूर येथील हुजूर कार्यालयास पत्राद्वारे पाठवली होती. तसेच मृत वाघही त्यासोबत पाठवण्यात आला होता. 14/09/1823 अशी या पत्रावर तारीख आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या परिसरात 200 वर्षांपूर्वी वाघाचे अस्तित्व होते आणि वाघाला पूरक असे घनदाट जंगल अस्तित्वात होते, याचा पुरावा समोर झाला आहे. येथील मोडी लिपीचे वाचक निसर्गमित्र सुरेश बेनाडे यांनी हे पत्र उपलब्ध केले असून या पत्राचा मराठीत अनुवादही त्यांनी केला आहे.
पोहाळे कुशिरे परिसरात आजही मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र आहे. वन विभाग, देवस्थान समिती व खासगी मालकीची जमीन याचा यात समावेश होतो. या भागात अनेक नैसर्गिक वनस्पती व प्राण्यांचे अस्तित्व दिसून येते; परंतु अलीकडे डोंगराला आग लागणे, प्राण्यांची शिकार अशा कारणांमुळे जंगल संपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे. या परिसरातील आगीचे प्रकार व शिकारीचे प्रकार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल सुरक्षेचे उपाय त्वरित अमलात आणणे गरजेचे आहे.
ऐतिहासिक पन्हाळा, जोतिबा (वाडी रत्नागिरी) या परिसरातील गावांमध्ये असा अनेक प्रकारचा ऐतिहासिक वारसा मोठ्या प्रमाणात आहे. पोहाळ्यातील लेणी हे याचेच उदाहरण आहे. तसेच अशी ऐतिहासिक कागदपत्रे उजेडात आणून यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.प्रा. उत्तम वडिंगेकर, (मोडी वाचक) इतिहास विभाग, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर