कोल्हापूर : रांगड्या महाराष्ट्राची सुसंस्कृततेचे प्रतीक असणार्या वस्तुनिष्ठ व्यक्तिरेखांचे ऐतिहासिक दस्तावेज ‘फुलासंगे मातीस वास लागे’ या डॉ. रमेश जाधव लिखित पुस्तकातून प्रकाशझोतात आले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव लिखीत ‘फुलासंगे मातीस वास लागे’ या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा नुकताच मंगळवार पेठेतील अक्षर दालन येथे झाला. यावेळी स्मिता जाधव यांच्यासह प्रा. एस.एन. पवार. डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य प्रवीण चौगुले, प्राचार्य टी. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. लवटे म्हणाले, महाराष्ट्रावर संस्कार करणार्या 26 नररत्नांवर सन 2026 मध्ये पुस्तक निर्माण झाले आहे. या व्यक्तिरेखांनी महाराष्ट्रातील दोनतृतीयांश लोकांवर संस्कार केले आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा यात समावेश आहे. लेखक डॉ. जाधव म्हणाले, आजपर्यंत खुप मोठी माणसे जीवनात आली. त्यांच्याबद्दलच्या पुस्तक निर्मितीचे काम माझ्या एकट्याची नसून त्यात अनेकांचे हात आहेत. प्रास्ताविक कवयित्री निलांबरी कुलकर्णी यांनी, तर सुत्रसंचालन डॉ. प्रल्हाद माने यांनी केले.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह अनेक दिग्गज
पुस्तकात लेखक डॉ. रमेश जाधव यांनी अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर लिखाण केले आहे. यात दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह आद्यचरित्रकार कृष्णराव केळुस्कर, नरहर कुरुंदकर, चार वेळचे आमदार त्र्यं. सी.कारखानीस, उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे आदींचा समावेश आहे.