कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दीला उधाण आले आहे. महाद्वार रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, गुजरी आणि राजारामपुरी परिसर ग्राहकांच्या अलोट गर्दीने अक्षरशः फुलून गेला आहे. शेतमालाला मिळालेले चांगले भाव आणि सलग सुट्ट्यांमुळे यंदा बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापारी वर्गाकडून वर्तवला जात आहे.
भाऊसिंगजी रोड आणि महाद्वार रोडवर रेडिमेड कपडे, पारंपरिक साड्या आणि लहानांच्या पोशाखांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. विविधरंगी पारंपरिक व पर्यावरणपूरक आकाशदिवे आणि घराघरांवर झगमगणारी आकर्षक एलईडी रोषणाई खरेदीकडे ग्राहकांचा ओढा आहे. त्यासाठी शाहू क्लॉथ मार्केट परिसर तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तू खरेदीसाठी शिवाजी स्टेडियम परिसरात गर्दी आहे. मुहूर्तावर मोबाईल खरेदी करण्याची तयारी देखील अनेकांनी केली आहे.
राजारामपुरी आणि ताराबाई रोडवर ठिकठिकाणी रांगोळीचे नानाविध रंग, नक्षीकाम केलेले स्टॅन्सिल्स आणि घर सजवण्यासाठी लागणाऱ्या तोरण-पणत्यांची दुकाने थाटली आहेत. बालगोपाळांच्या आवडीचे मातीचे किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या सुबक मूर्ती खरेदी करण्यासाठी बच्चेकंपनीची लगबग पाहायला मिळत आहे.
लक्ष्मीपूजनासाठी लागणारे केरसुणी, लाह्या-बत्तासे, झेंडूची फुले आणि धूप-दीप आदी पूजा साहित्याने गुजरी महाद्वार रोड परिसर गजबजला आहे. तर दुसरीकडे गांधी मैदान व उपनगरांतील मैदानांवर उभारलेल्या फटाक्यांच्या स्टॉल्सवर सुरक्षित फॅन्सी फटाके आणि आतषबाजीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. वाहन बाजार आणि इलेक्ट्रॉनिक्स दालनांनंतर आता कपडे, सजावट व पूजा साहित्याच्या तुफान विक्रीमुळे संपूर्ण करवीरनगरी खऱ्या अर्थाने प्रकाशाच्या उत्सवात न्हाऊन निघाली आहे.