कोल्हापूर : केंद्रीय अर्थसंकल्पातील महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार्या घोषणांमुळे कोल्हापुरातील महिला उद्योगाला बूस्ट मिळण्याचे संकेत दिसत आहेत. शिक्षण, रोजगार, उद्योजकता, आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षिततेच्या द़ृष्टीने महिला केंद्रित अनेक महत्त्वाच्या योजना आणि सुविधांमुळे जिल्ह्यातील युवती व महिलांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
स्वतंत्र वसतिगृहाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी शहरात सुरक्षित निवास उपलब्ध होणार असून शिक्षणातील गळती रोखण्यास मदत होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लखपती दीदी योजनेचा विस्तार महिलांना स्वयंरोजगारातून उद्योजकतेकडे नेणारा मार्ग ठरेल. उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शी मार्ट ही नवी संकल्पना मांडली. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट विक्रीची संधी, बँक कर्ज, वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदारांकडून सुलभ सहाय्य मिळणार आहे.
जिल्ह्यात बचतगटाद्वारे व व्यक्तीगत असंख्य महिला उद्योग करत आहेत. त्यांना हा निर्णय लाभदायक ठरणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनवाढीमुळे खाद्यपदार्थ क्षेत्रात महिला उद्योजकांना चालना मिळणार आहे. सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी ममिशन शक्तीफ मुळे महिलांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान अधिक भक्कम होणार असल्याचे चित्र आहे. एकूणच, केंद्रीय अर्थसंकल्प महिलांच्या शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंतचा प्रवास अधिक मजबूत करणारा ठरणार असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.