कोल्हापूर : सीपीआर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात प्रलंबित बिले आणि पैशांची देवाणघेवाण हिशेब वही सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यातील दोषींवर सरकार कारवाई करणार का, असा थेट प्रश्न शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला.
शिवसेना उबाठा गटाचे उपनेते संजय पवार व पदाधिकारी यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर शुक्रवारी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात या प्रकाराबाबत तब्बल अर्धा तास चर्चा झाली. आमदार जाधव यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना दोषींवर कोणती कारवाई करणार, असा सवाल केला आहे. जाधव म्हणाले, बदल्या आणि बिल पास करण्यासाठी पैसे घेतल्याचा उघड आरोप झाला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमली आहे. यात दोषी आढळल्यास निश्चितच कारवाई होईल. मेडिकल बिलांसाठी आर्थिक मागणी करण्याचा मुद्दा अनेक रुग्णालयांत दिसून येतो. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत सर्व बिलांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल, असे स्पष्ट केले.