इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्याकडील प्रशासकपदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी राज्यपालांच्या आदेशाने जारी केले असून, प्रशासकीय कारणास्तव ही नियुक्ती केल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. या निर्णयाला राजकीय किनार असल्याची चर्चा होती.
इचलकरंजी महापालिकेत 6 जुलै 2023 रोजी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती झाली आहे. कामकाजातील शिस्त कायम ठेवण्यासह महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या द़ृष्टीने, तसेच विकासकामांबाबत ते बर्याच प्रमाणात यशस्वी ठरले.
ओमप्रकाश दिवटे यांच्या वर्षपूर्तीला अवघे काही दिवस बाकी असताना पुन्हा त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. बदलीच्या विरोधात दिवटे यांनी प्रशासकीय न्यायाधीकरण बोर्डाकडे धाव घेतली होती. त्यांची बदली रद्द होऊन त्यांना कायम ठेवण्याचे आदेश बोर्डाने दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडे महापालिकेचा कार्यभार कायम होता.
माजी आ. प्रकाश आवाडे आणि आयुक्त दिवटे यांच्यात वादही झाला होता. पालिकांच्या निवडणुका न झाल्याने राज्यात नगराध्यक्ष किंवा महापौर यांच्या अधिकाराचे प्रशासकपदही आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महापालिकेचे आयुक्त दिवटे यांच्याकडेही प्रशासकपदाचा कार्यभार होता. मात्र, आज तडकाफडकी प्रशासकीय कारणास्तव महापालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तातडीने प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारावा आणि आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे, असेही शासन आदेशात नमूद केले आहे.
राज्यातील 28 महापालिकांमध्ये आयुक्तांकडे प्रशासकपदाचा कार्यभार असून, आयुक्तांकडील प्रशासकपदाचा कार्यभार जिल्हाधिकार्यांकडे सोपवण्यात आल्याची इचलकरंजी महापालिकेतील ही पहिलीच घटना आहे. यामुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला होता.