कोल्हापूर : प्रत्येक संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. रोख रक्कम, मद्यसाठा किंवा मतदारांना आमिष दाखवणारी कोणतीही वस्तू बेकायदेशीरपणे मतदारसंघात जाणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. त्यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्थिर सर्वेक्षण पथकांना दिला.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येडगे यांनी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासमवेत कोल्हापूर शहराच्या सीमेलगत करवीर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकांसह रमण मळा येथील ईव्हीएम स्ट्राँग रूमला भेट देऊन मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. प्रत्यक्ष वाहनांच्या तपासणीची कार्यपद्धतीची पाहणी करत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवा असे आदेश दिले. येडगे म्हणाले, जिल्ह्यात बेकायदेशीरपणे रोख रक्कम, मद्यसाठा किंवा मतदारांना आमिष दाखवणारी कोणतीही वस्तू शिरणार नाही, याची पूर्ण जबाबदारी पथकांची आहे. तपासणीदरम्यान सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यासमोर पार पाडा. त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रमण मळा येथील ईव्हीएम स्ट्राँग असलेल्या गोदामाची पाहणी केली, जिथे त्यांनी स्ट्राँग रूमच्या त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली. स्ट्राँग रूमच्या बाहेर तैनात असलेल्या सशस्त्र दलाची उपस्थिती, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कव्हरेज आणि लॉगबुकची नोंदणी या सर्व बाबी त्यांनी तपासून घेतल्या. यानंतर येडगे म्हणाले, ईव्हीएम मशिनची सुरक्षितता ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याने तिथे चोवीस तास कडक पहारा ठेवण्याचे आदेश त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले. तसेच पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन स्ट्राँग रूममध्ये ओलावा येणार नाही आणि अग्निशमन यंत्रणा सज्ज राहील, याची खात्री करा, असे आदेशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम आणि निवडणूक विभागाला दिले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक आरंक्षा यादव, निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल पवार, तेजस्विनी पाटील आदी उपस्थित होते.