कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Pudhari News network
कोल्हापूर

kolhapur | जिल्हा मध्यवर्ती बँकही देणार म्हशीसाठी दहा हजार अनुदान

संचालक मंडळ बैठकीत चर्चा : मुश्रीफ यांच्या अध्यक्षपद राजीनाम्याचा विषय फेटाळला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळप्रमाणे शेतकर्‍यांच्या जातिवंत म्हशीसाठी जिल्हा बँकेतून कर्ज घेणार्‍या दूध उत्पादक शेतकर्‍याला दहा हजार रुपये अनुदान देण्याबाबत सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय बँकेने घेतला. यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना म्हैस, गाय खरेदीसाठी साधारणपणे 20 लाख रुपये कर्ज उपलब्ध होणार असून, त्यामध्ये सुमारे साडेसहा ते सात लाख अनुदान मिळणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बँकेच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर या बैठकीत पडदा पडला. त्यांच्या राजीनाम्याचा विषय सर्व संचालकांनी फेटाळून लावला. संगणक सल्लागार कंपनीची मुदत संपल्याने त्याला मुदतवाढ देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

राज्य शासनाचा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम बँकेच्या वतीने राबविला जातो. केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला जातो. मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये दुग्ध व्यवसायासाठी जनावरे खरेदीचा उल्लेख नाही. परंतु, प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात दुधाच्या व्यवसायासाठी म्हैस, गाय खरेदीसाठी 20 लाख रुपये कर्ज देण्याची योजना आहे. त्यामुळे बँकेच्या वतीने ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. त्यांनीच यासंदर्भातील वक्तव्य केले होते. यावर प्रथम त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत राजीनामा देऊ नये, अशी मागणी केली होती. मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीतही संचालकांनी मुश्रीफ यांच्या राजीनाम्याचा विषय फेटाळून लावल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राजूबाबा आवळे, संचालक सतेज पाटील, निवेदिता माने, संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबिटकर, रणजित पाटील, राजेश पाटील, भैया माने आदी उपस्थित होते.

बँकेची सर्वसाधारण सभा दि. 8 सप्टेंबर रोजी

जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 8 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT