Illegal Constructions | निवडणुकीला पैसे दिलेत, आता कसले मागता; नेत्यांची तंबी आमच्या नावावर गोळा केलेले द्यायला नको का; सेवकांचे मत 
कोल्हापूर

Illegal Constructions | निवडणुकीला पैसे दिलेत, आता कसले मागता; नेत्यांची तंबी आमच्या नावावर गोळा केलेले द्यायला नको का; सेवकांचे मत

१०० कोटींची सुपारी अन् ५३ कोटी टोकन वसुली; गांधीनगर रोडवरील बेकायदेशीर बांधकामावरून ठरावीक कारभारी अन्‌ सेवकांत जुंपली

पुढारी वृत्तसेवा

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील २०४ बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याच्या हालचालींनी आता वेगळेच वळण घेतले आहे. बांधकामे नियमित करण्यासाठी तब्बल १०० कोटींची सुपारी फुटल्याची जोरदार चर्चा आहे. त्यापैकी तब्बल ५३ कोटी रुपये टोकन अमाऊंट म्हणून शहर व परिसरातील ठरावीक कारभाऱ्यांनी जमा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातूनच सेवकांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. ‘निवडणुकीला तुम्हाला पैसे दिलेत, आता कसले मागता’ असा दम भरला जात असल्याचे सांगितले जाते. यावर सेवकांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. ‘आमच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केले असतील, तर ते आम्हाला द्यायला नकोत का,’ अशी भूमिका काही सेवकांनी घेतल्याचे बोलले जाते.

या कथित कोट्यवधींच्या व्यवहारात महापालिकेतील सर्वच पक्षांचे कारभारी सहभागी असल्याची कुजबुज असून, आता या कथित ‘डील’वरून शहर व परिसरातील कारभारी आणि महापालिकेचे सेवक यांच्यातच जुंपल्याचे चित्र आहे. बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी पडद्यामागून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. नियम, कायदे आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या चौकटीत हा विषय हाताळण्याऐवजी आर्थिक गणिते जुळविण्यावर भर दिला जात असल्याची चर्चा आहे. शहरातील ठराविक कारभारी आणि महापालिकेतील कारभारी यांच्यात मोठ्या रकमेच्या वाटपाची तयारी सुरू असल्याची चर्चा असतानाच, सेवकांच्या वाट्याला मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकी रक्कम येणार असल्याचे सांगितले जात आहे. कोट्यवधींच्या कथित व्यवहारात सेवकांना लाखांत भागविण्याचा प्रयत्न होत असल्याने असंतोष उफाळला आहे.

कोट्यवधींचा डाव, जबाबदारी मात्र सेवकांच्या माथी? २०४ बांधकामे नियमित करण्याच्या नावाखाली कोट्यवधींचा कथित व्यवहार, राजकीय दबाव, ठराविक कारभार्यांचा सहभाग आणि सेवकांना लाखांत आमिष दाखविण्याची चर्चा यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सर्वच पक्षांच्या कारभाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा होत असताना, या कथित आर्थिक व्यवहारांची सत्यता काय, ५३ कोटींच्या टोकन अमाऊंटचा हिशेब कुठे आहे, पैसे नेमके कुणाकडे जमा झाले आणि सेवकांवर दबाव आणला जातोय का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. गांधीनगर रोडवरील बांधकामे नियमित करण्याच्या प्रयत्नांत नेमका कोणाचा फायदा आणि कोणाचा बळी जाणार? कोट्यवधींच्या कथित डावात नेत्यांची तिजोरी भरणार आणि कायद्याच्या कचाट्यात मात्र महापालिकेचे सेवक अडकणार, या प्रश्नांनी आता महापालिकेतील वातावरण तापले आहे. कारभाऱ्यांना कोट्यवधी, तर सेवकांना पाच लाखांचा तुकडा एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार नेमका कुणाकडे झाला? पैसे कुणाकुणाला मिळाले? याचा हिशेब कोण देणार? महापालिकेतील सर्वपक्षीय कारभाऱ्यांच्या कथित सहभागामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. कोट्यवधींचा मलिदा ठरावीक कारभाऱ्यांनी खायचा आणि कायद्याच्या कचाट्यात सेवकांनी अडकायचे, हा कुठला न्याय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT