कोल्हापूर : ट्रेडिंग सोल्युशन कंपनीच्या फरार असलेल्या संचालकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी पलूस येथून अटक केली.   (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

ट्रेडविंग सोल्युशनच्या संचालकास अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सची उपकंपनी ट्रेडविंग सोल्युशन लिमिटेड कंपनीच्या फरार संचालकास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सांगलीतून मंगळवारी अटक केली. संतोष नंदकुमार कुंभार (वय 41, रा. दत्तनगर, पलूस, सांगली) असे त्याचे नाव आहे. सव्वातीन वर्षांपासून तो फरार होता. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गुंतवणूकदारांना कमी कालावधीत जादा परतावा, तसेच परदेशी सहल, इतर मोठे लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एस. एस. ट्रेडर्स व त्याची उपकंपनी असणार्‍या ट्रेडविंग सोल्युशनने कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील हजारो गुंतवणूकदारांना गंडा घातला. परतावा मिळण्याचे बंद झाल्यानंतर या कंपनीच्या संचालकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्याप्ती ओळखून हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला आहे. फसवणुकीच्या या गुन्ह्यात आतापर्यंत 20 जणांना अटक झाली असून, त्यांच्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र व पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर तीनजणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्यातील 16 संशयित गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. संचालक संतोष कुंभार हा 3 वर्षे 2 महिने 27 दिवसांपासून फरार होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक त्याच्या मागावर होते. कुंभार हा पलूस येथील घरात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी पलूस येथील घरातून कुंभार याला अटक केली. कारवाई आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, एलसीबीचे उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अनिल जाधव, अंमलदार युवराज पाटील, अमित सर्जे, राजू येडगे, संजय हुंबे यांनी केली.

तपासावर एसपींचे लक्ष

या प्रकरणातील तपासावर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी लक्ष ठेवले आहे. फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एलसीबीचे एक पथकच यासाठी तैनात केले आहे. दर आठवड्याला पोलिस अधीक्षक तपासाचा आढावा घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT