water supply  FIle Photo
कोल्हापूर

kolhapur | थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद

काळम्मावाडीतील पातळी घटली; कोल्हापूरला शिंगणापूरसह जुन्या योजनांतून पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनचा होणारा पाणी पुरवठा गुरुवारपासून (दि. ११) बंद झाला. काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी ६४६ मीटर असेपर्यंत उपसा होऊ शकतो. परंतु आता ६३६ मीटर पातळी झाली आहे. यामुळे योजनेचा उपसा बंद पडला आहे. परिणामी शहराला शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

पातळी वाढेपर्यंत योजना बंद

काळम्मावाडी धरणातून ५३ किलोमीटर लांब १८०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकून पुईखडी येथे पाणी आणलेे. येथे प्रत्येकी ४० एमएलडी क्षमतेच्या दोन जल शुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण करून शहराला पुरवठा होतो. नोव्हेंबर २०२३ पासून शहराला थेट पाईपलाईन योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाला. परिणामी पहिल्यांदाच धरणात पाणीसाठा नसल्याने योजना ठप्प झाली आहे. आता पाऊस पडून धरणातील साठा वाढेपर्यंत थेट पाईपलाईन योजना बंद राहणार आहे. त्‍यामुळे पंचगंगेतून शिगणापूर केंद्राद्वारे आणि भोगावती नदीतून बालिंगा व नागदेववाडी केंद्राद्वारे कोल्हापूरला पाणीपुरवठा केला जात आहे.

कळंबा उपसाही आठवड्यात बंद

मंगळवार पेठ व परिसरात कळंबा तलावातून पाणीपुरवठा होताे. परंतु तलावाचीही पातळी कमी झाली असून गुरुवारी (दि. ११) ती नऊ फूट इतकी होती. चार फूट पातळी झाल्यानंतर तलावातून उपसा बंद होताे. आठवड्यानंतर कळंबा तलावातूनही पाणी उपसा बंद होईल.

असा होणार शहरात पाणीपुरवठा

* शिंगणापूर उपसा केंद्रातून ए वॉर्ड, बी वॉर्ड व ई वॉर्डातील राजारामपुरी विभाग.

* शिंगणापूर उपसा केंद्रातून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे संपूर्ण ई वॉर्ड.

* बालिंगा, नागदेववाडी केंद्रातून संपूर्ण सी व डी वॉर्ड.

काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने थेट पाईपलाईनचा उपसा बंद झाला आहे. त्यामुळे पर्यायी शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रातून कोल्हापूरला पाणीपुरवठा सुरू केला आहे.
हर्षजित घाटगे (जल अभियंता)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT