कोल्हापूर : दिलबहार तालीम मंडळाचा 2-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करून जुना बुधवार तालीम मंडळाने आघाडी मिळविली. तत्पूर्वीच्या सामन्यात उत्तरेश्वर तालीम मंडळाने पाटाकडील ‘ब’ संघावर विजय मिळवत ‘केएसए’ शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत आगेकूच केली. ‘केएसए’ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.
उत्तरेश्वरचे दोन्ही गोल पूर्वार्धात
गुरुवारी दुपारच्या सत्रात पहिला सामना उत्तरेश्वर तालीम विरुद्ध पाटाकडील तालीम ‘ब’ यांच्यात झाला. उत्तरेश्वरकडून आघाडीसाठी योजनाबद्ध चाली करण्यात आल्या. यात त्यांना 33 व्या मिनिटाला यश आले. श्रीकांत मानेने पहिला गोल केला. यानंतर 43 व्या मिनिटाला अथर्व पाटीलने दुसरा गोल नोंदवून मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात त्यांच्या साकिब मणियार, प्रतीक कांबळे विश्वजित भोसले यांनी आघाडीत भर घालण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. पाटाकडील ‘ब’कडून गोल फेडण्यासाठीचे प्रयत्न सुरूच होते. गौरव माळी, ओंकार देवणे यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न उत्तरेश्वरच्या भक्कम बचावाने फोल ठरवले. यामुळे एकाही गोलची परतफेड त्यांना करता आली नाही. अखेर सामना उत्तरेश्वरने 2-0 असा जिंकला.
प्रथमेश जाधवचे दोन गोल
सायंकाळचा सामना जुना बुधवार पेठ विरुद्ध दिलबहार तालीम यांच्यात रंगला. प्रारंभी चौथ्या मिनिटाला जुना बुधवारच्या प्रथमेश जाधवने गोल नोंदवून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 23 व्या मिनिटाला प्रथमेश जाधवने डी बाहेरून मारलेल्या थेट फटक्याने दिलबहारच्या गोलपोस्टचा वेध घेत आपला व संघाचा दुसरा गोल नोंदवला. उत्तरार्धात त्यांच्या रविराज भोसले, शुभम जाधव, थुलुंगा, नोगाम्बा यांनी आघाडीत भर घालण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. शुभम जाधवने मारलेला जोरदार फटका दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेथे याने बाहेर काढला. दिलबहारकडून प्रथमेश भोसले, निक्सन, सुशांत अतिग्रे, सार्थक मगदूम यांनी गोलची परतफेड करण्यासाठी केलेले जोरदार प्रयत्न अपयशी ठरले. यामुळे सामना जुना बुधवारने 2-0 असा जिंकत पहिल्या फेरी अखेर 3 गुणांची कमाई केली.
खेळाडूंत हाणामारी, प्रेक्षक गॅलरीत हुल्लडबाजी
दोन्ही सामान्यांदरम्यान मैदानात खेळाडूंत हाणामारी व प्रेक्षक गॅलरीत हुल्लडबाजीचा प्रकार घडला. उत्तरेश्वरच्या अथर्व मोरे व पाटाकडील ‘ब’च्या रोहित देवणे यांच्यात मैदानावर हाणामारी झाली. यामुळे मुख्य पंचांनी दोघांना रेड कार्ड दाखवून सामन्याबाहेर काढले. यावेळी समर्थकांनी हुल्लडबाजी केली. जुना बुधवार विरुद्ध दिलबहार यांच्यातील सामन्यावेळी प्रेक्षक गॅलरीत थुंकण्याच्या कारणावरून दोन्ही संघांतील समर्थकांत वाद झाल्याने काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. गॅलरीतील पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण नियंत्रणात आणले.
आजचे सामने
संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब
वेळ : दुपारी 1.30 वाजता
पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ
वेळ : दुपारी 4 वाजता